खाजवून खरूज काढू नका, जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा
शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेवरून जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.;
राज्यात एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तर एकनाथ शिंदे यांनी आपणच शिवसेना असल्याचे सांगत मुख्यंमत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर शिवसेनेतील शिंदे गटाने शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याने सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गटाने शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, अहो केसरकर तुम्ही शरद पवार यांच्याविरोधात किती बोलता? एके काळी सिंधुदुर्ग आणि गोव्यात शरद पवार शरद पवार यांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला हाताला धरुन फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 2014 मध्ये शरद पवार यांचा निरोप घेऊन मी आलो होतो की जिथे आहात तिथे सुखी रहा सांगायला. याबरोबरच खाजवून खरूज काढू नका, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दीपक केसरकर यांना दिला.
अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 13, 2022
ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात
2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन
जिथे आहात तिथे सुखी राहा
खाजवून खरूज काढू नका
तसेच जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर हे ट्वीट पोस्ट करत म्हटले आहे की, शरद पवार यांच्याबद्दल तुम्ही काहीही बरळत असताना इतके दिवस शांत होतो. पण आज मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याबद्दल बोललात तर जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेतील शिंदे गटाला दिला आहे.
काय म्हणाले होते दीपक केसरकर?
दीपक केसरकर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना म्हणाले की, शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या सर्व बंडामागे शरद पवार यांचा हात होता. तसेच त्यांनी हे सांगितले की, नारायण राणे यांनी बंड केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना पक्षाची मर्यादा घातली नव्हती. हा निश्चित त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तर या गोष्टी मी राष्ट्रवादीत असताना शरद पवार विश्वासाने सांगायचे, असंही दीपक केसरकर म्हणाले.