गोविंदांची माफी मागणारी जितेंद्र आव्हाड यांची भावनिक पोस्ट व्हायरल

दहीहंडी हा राज्यातील जनतेसाठीचा साहसी खेळ. त्यामुळे या खेळाशी भावनिक नातं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी भावनिक पोस्ट लिहीत गोविंदांची माफी मागितली आहे. वाचा काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड...;

Update: 2022-08-19 02:37 GMT

माझ्या प्रिय बाळ गोपाळांनो - गोविंदांनो

उद्या कृष्णजन्माष्टमी ....

गोकुळात भगवान श्री कृष्ण जन्मले आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. नीतीने भ्रष्ट आणि वागणुकीने दृष्ट अश्या कंस मामाचा वध करत भगवंताने जुलमी राजवटीचा अंत केला. अशा ह्या नटखट बाळ गोपाळ श्रीकृष्ण भगवंताची दही-लोणी मिळवण्यासाठीची सख्या सोबत्यांसोबतची कसरत म्हणजे एखादा उत्सवच आणि ह्याच खेळाची आठवण म्हणजे आपला आवडता दहीकाला किंवा दहीहंडी. ज्याची प्रत्येक तरुण तरुणी, बाळ गोपाळ वाट पाहतात तो क्षण... मराठी मातीत आणि मराठी मनामनात रुजलेला पवित्र श्रावण महिन्यातील आवडता सण...

मी देखील तुमच्या सर्वांसारखीच ह्या सणाची आवर्जून वाट पाहणारा आणि उत्साहाने दहीहंडीचे आयोजन करणारा कारण माझे बालपणच चाळीतील एका छोट्याश्या खोलीतले आणि चाळ म्हंटली तर तुम्हाला माहीतच असेल दहीहंडी म्हणजे धम्माल. लहानपणी असाच एकदा दहीहंडी मध्ये थरावर थर लावताना पाय सटकून खाली पडलो आणि डोक्याला मार लागला... त्या दिवशी आई वडील खूप रागावले खूप ओरडले खूप चिंताग्रस्त झाले पण आपला उत्साह दांडगा आणि इतक्या वर्षांमध्ये टिकून राहिला सुद्धा...1993 साली मी पहिली दहीहंडी स्पर्धा आयोजित केली... पहिली स्पर्धा आणि मी दिवसभर नाही असे होईल का ? सकाळी 9 वाजता मी व्यासपीठावर हजर तर ते थेट रात्री 11 वाजेपर्यंत... माझे जेवण हि तिकडेच आणि दिवसभर श्रम हि तिकडेच… हे दरवर्षीचे होते.

संघर्ष च्या माध्यमातून दहीहंडीला एक जागतिक परिमाण लाभावे म्हणून अनेक प्रयत्न केले. प्रत्येक संघाला बक्षीस... थरांवर बक्षीस देणारा कदाचित मी एकमेव असेन आणि हंडी फोडणारे तर एकदम खासच... मला आठवतंय एका वर्षी तर 100 हून ही अधिक संघानी दहीहंडीला भेट दिली आणि मी एकही संघाला रिकाम्या हातानी नाही जाऊ दिले कारण हंडी फुटली नाही म्हणून काय झाले त्यांची मेहनत फार महत्वाची...

अशी ही दहीहंडी म्हंटली की सर्व सर्व जाती भेद ,धर्म भेद विसरून एकत्र येणे खेळ खेळण्याचा हा सण निराळाच. खालील थर उभारणारी माणसे मजबूत असली की वरील नेतृत्व करणारे बाळ गोपाळ एकदम निर्धास्त आणि मग एकच फटका मारला रे मारला की फुटली रे फुटली हंडी फुटली चा जल्लोष... वाह अजूनही आठवते हे सगळे....

परंतु आता हे शक्य नाहीये मधील दोन वर्ष तर कोरोना मध्येच गेले त्यातल्या त्यात कोर्टाचे निर्णय आलेत काही निर्बंध गोविंदांच्या वयाचे अथवा साहसी खेळाचे नियमांचे देखील… आजही हे पाहतो तेव्हा मनातील भावना दाटून येतात... दुरून पाहतो आता हे सगळे… एकांतात कोंडून घेतो जेव्हा बालपणीच्या आठवणी दाटून येतात.

माझ्यातील गोविंदा कधीच संपणार नाही. तो हंडी फोडतच राहणार! दहिहंडी उत्सवाला सुरुवात केली त्याचवेळी मनात आले होते की हा मराठमोळा क्रीडा प्रकार जगभर पोहचवायचा; अन् 1999 साली दहिहंडी अन् गोविंदा जगभर पोहचविला; ग्लोबल केला. जगभरातील माध्यमांना दहिहंडीची दखल घ्यायला लावली. त्यानंतरच माझ्या दहिहंडीच्या मंचावर अनेक नेते येऊ लागले आज त्यांनी स्वत: दहिहंडी बांधायला सुरुवात केलेय.

काल जेव्हा मी गोविंदा पथकांचा सराव पहायला गेलो; अनेक गोविंदा पथकांना भेटी दिल्या. त्यावेळी लक्षात आले की कधीकाळी मी ज्या स्पेनच्या कॅसलर्सला ठाण्यात आणले होते; त्यांचे तंत्रच आपली गोविंदा पथकेही वापरत आहेत. अर्थात, त्याचा फायदाच झालाय; कारण, जास्त थर आणि तेही कमी वेळात लावणे गोविंदांना शक्य होतंय !

गोविंदा अन् दहिहंडी आपण ग्लोबल केली, याचा अभिमान आहेच. पण, हा उत्सव आपण बंद केला, याची खंत आहे. असो, आपण आपल्या श्री कृष्णाचा, बाळगोपाळांचा खेळ जगभर नेला, यातच सारे काही आहे.

तेव्हा माझ्या प्रिय गोविंदांनो ...संघर्षातून उभी राहिलेली दहीहंडी यावर्षी आयोजित नाही करत आहे त्यासाठी आपणा सर्वांची माफी मागतो. परंतु आवाहनही करतो की व्यवस्थित खेळा आणि सुरक्षित राहा आणि सर्वात महत्वाचे आपला उत्साह मात्र कायम ठेवा. जय महाराष्ट्र, जय भीम, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी गोविंदांची माफी मागत भावनिक पोस्ट लिहीली आहे.

Tags:    

Similar News