मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.निवडणुकीपूर्वी दाखवलेल्या 'अच्छे दिन'चे विदारक चित्र समोर आले आहे असं म्हणत देशातील वाढत्या बेरोजगारीवर शिवसेनेने बोट ठेवले आहे.
ऑगस्ट महिन्यात 16 लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. ग्रामीण भागात तर बेरोजगारीने अक्षरशः कहर केला आहे. त्यात भाजपने बेरोजगारांच्या हाती घंटा दिल्या आहेत. घंटा वाचवत बसा व मंदिरे उघडा अशी मागणी करत रहा. असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
सोबतच देशाच्या जीडीपी बाबत बोलताना अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाच्या जीडीपीचे गुलाबी चित्र दोन दिवसांपूर्वीच रेखाटले. त्या गुलाबाचे काटे आता टोचू लागले आहेत आणि पाकळ्या झडू लागल्या आहेत असं सामनाच्या माध्यमातून म्हटलं आहे.
घंटा बडवून वगैरे बेरोजगारीचा राक्षस मारला जाणार असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयाने एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या दारात आता घंटा लावून रोजगार निर्मितीचे दालन उघडायला हवे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.