नीच कोण आहे?

Update: 2017-12-07 17:10 GMT

गुजरात निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ९ तारखेला मतदान होणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या वगैरे बोगस वाक्य मी वापरणार नाही. आता या क्षणापासून खऱ्या प्रचाराला सुरूवात झाली. आजपासून राजकीय पक्षांची खरी औकात आपल्याला दिसून येईल. नव्हे, ती आज दिसलीच.

बाबरीकांडावर काल 'मॅक्समहाराष्ट्र'वर चर्चा करत असतानाच मी असं म्हटलं होतं की, ‘विकासाच्या नावावर सुरू झालेली निवडणूक सोमनाथ मंदिराच्या निमित्ताने धर्माच्या नावावर आली. ती हलकेच हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आली. धर्माधारित राष्ट्रवादाच्या कल्पनेवर आली. आता शेवटच्या टप्प्यात ती जातीवर येईल. २०१४ च्या निवडणूकीत प्रियांका गांधी यांच्या एका वाक्याचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी ‘नीच जात’चा मुद्दा प्रचारात आणला. आता ही या निवडणूकीत हाच मुद्दा आणला जाईल’

अवघ्या २४ तासांच्या आत गुजरातची निवडणूक ‘नीच’ या शब्दाभोवती फिरताना दिसतेय. भारतीय निवडणूकांमध्ये अगदी स्वाभाविकपणे जात डोकावत राहते. ती जात नाही. कितीही विकासाच्या गप्पा मारल्या तरी ती शेवटी निवडणूक तिथेच येऊन थांबते. कदाचित भारतीय समाजाचीच ती गरज आहे.

मणिशंकर अय्यर नावाच्या काँग्रेस नेत्याने नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे गुजरात निवडणूकीतील प्रचाराचा मुद्दाच बदलून गेला आहे. याच अय्यरांमुळे २०१४ च्या निवडणूकीत काँग्रेसला गरम चहाच्या किटलीचा चटका बसला होता. यंदा अय्यर यांच्या विधानांपासून राहुल गांधी यांनी जाहीर फारकत घेतलेली असली तरी 'बूँद से गई वो हौद से नहीं आती' सारखी स्थिती काँग्रेसची झाली आहे. या निवडणूकीत काँग्रेसने काही कमवलं नाही तरी चालणार आहे, पण आपल्या मूर्खपणामुळे काही गमवावं लागणार नाही एवढी काळजी तरी घेतली पाहिजे होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत ‘नीच’ या संबोधनाला स्वत:पर्यंत खेचून आणतात. मग ते कुठल्याही संदर्भात का बोललं गेलेलं असू देत. या मागे त्यांची चतूर राजकीय खेळी आहे. राहुल गांधी यांच्या पक्षाने त्यांना जानवेधारी हिंदू केल्यानंतर राहुल गांधी यांना मात देण्यासाठी जातीचच कार्ड वापरलं जाणार हे स्पष्ट होतं. हिंदुत्व म्हणजे जानवं नाही हे राहुल गांधी यांच्या 'थिंकटँक'ला समजायला हवं होतं. उलट राहुलच्या जानव्याने मोदींसाठी लढाई आणखी सोप्पी केली. या देशातील बहुजन समाजाच्या आकांक्षाचं राजकारण करण्यात राहुल गांधी अपयशी ठरले. नरेंद्र मोदी यांनी ही संधी घेतली.

पटेल समाजाच्या जोरदार मोर्चामुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी जातीचा हा मुद्दा उचलत आज सोशल मिडीयावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. हे होत असतानाच भाजपशासित राजस्थानमधील एक व्हिडीयो व्हायरल झाला. एका मुस्लीम कारागिराला 'लव्ह जिहाद'चा आरोप ठेवून कुऱ्हाडीने मारून जिवंत जाळल्याला तो व्हिडीयो होता. या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं गेलं. राजस्थानची घटना निश्चितच माणुसकीला काळीमा फासणारी आहे, मात्र भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेला आवश्यक रसायन पुरवणारी ठरली.

जात आणि धर्माच्या नावावर ध्रुवीकरण लवकर होतं, याचा वापर सर्वच राजकीय पक्ष निवडणूकांमध्ये करतात. भाजपला आता ध्रुवीकरणासाठी दोन्ही मुद्दे मिळालेत. अशा वेळी विकासाची कोणालाच चिंता नाहीय. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील स्टार प्रचारक ‘विकास’ आता गायब झालाय. 'विकास वेडा झालाय' अशी कँपेन काँग्रेसने केली होती. विकास वेडा नाही झालाय, धर्म-जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी त्याला वेडा केलाय. अशा वेळी जनता-जनार्दनाच्या हातात आता सर्व आहे, असं बोलून देशाचं भवितव्य अंधारात ढकलून आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होणार नाही. कुणाची जात काय आहे, हे बघून मतदान करायचं ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी या समस्येवर उपाय सापडेल, आणि तो दिवस सध्यातरी दृष्टीक्षेपात नाही.

Similar News

यंदा कोण...?