मुंबई-गोवा महामार्गाचे काम सिमेंट बेस ट्रीटमेंट द्वारे युद्धपातळीवर सुरू
रायगड- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील 14 वर्षांपासून रेंगाळले आहे. सद्यस्थितीत खड्डे, दगड गोटे व चिखलाने महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालीय. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गावर वडखळ ते नागोठणे येथील चिखली दरम्यान महामार्गाच्या कामाची पाहणी केली.
दरम्यान मुंबई गोवा महामार्गाचे काम सिमेंट बेस ट्रीटमेंट द्वारे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. अत्याधूनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. महामार्गाच्या पहिल्या लेनचे काम गणपती पूर्वी पूर्ण होणार आहे, तर दुसऱ्या लेनचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचता दिवसाला 500 मीटरचे काम सिमेंट बेस ट्रीटमेंट या तंत्रानुसार पूर्ण होणार आहे. रस्ता पूर्ण झाल्यावर 12 तासाने वाहतूक सुरू केली जाणार आहे. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. यामध्ये 40 टन व्हायब्रेट रोलर, सिमेंट, केमिकल मिक्सर द्वारे रस्त्याचे काम सुरू आहे, या कामासाठी लागणाऱ्या मशीन इंदोर येथून आणल्या आहेत, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.