बीड: बीडमध्ये इंधनदरवाढी विरोधात निषेध करत, एक महिला वकील चक्क घोड्यावरून जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचली. या अनोख्या आंदोलनाची चर्चा आता जिल्हाभरात सुरू आहे. हेमा पिंपळे असे या वकीलाचे नाव आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असून, याची झळ सगळ्यांनाच बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात बीड जिल्ह्यातील पिंपळे या महिला वकीलाने आगळंवेगळं आंदोलन करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
या महिला वकीलाने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी चक्क घोड्यावरून न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. तर,पेट्रोलचे दर १०० रु. लीटर झाल्याने वाहनात पेट्रोल टाकणे परवडत नाही. वकिली व्यवसाय सध्या ठप्प आहे, त्यामुळे आपण निषेध करण्यासाठी घोड्यावरून न्यायालयात आल्याचं हेमा पिंपळे यांनी सांगितले.