कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे- कृषिमंत्री भुसे
कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या काळात अनेक शेतकऱ्यांनी अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली.
राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महिला किसान दिन कार्यक्रमादरम्यान कृषिमंत्री भुसे बोलत होते.
यावेळी महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उतारावर महिलांचे नाव लावून घ्यावे. आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महिला शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. विपणन प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या साडेतीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीचे दिवाळीपूर्वी वितरणासाठी प्रयत्न सुरू आहेत.असं भुसे म्हणाले.