भाजप नगरसेवकाची महिला तलाठीला मारहाण

भाजप नगरसेवकाची महिला तलाठीला मारहाण, काय आहे प्रकरण वाचा

Update: 2021-06-06 07:28 GMT

नंदुरबारमधील भाजप नगरसेवक गौरव चौधरी (BJP Corporator Gaurav Chaudhary) यांनी तहसिलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण (Woman talathi Beat) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा (Nisha Pawara) या महिला तलाठी यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरात मधुन महाराष्ट्रात वाळू वाहतुकीची पावती नव्हती. म्हणून या तपासणी पथकाने दोन तास वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला. यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निशा पावरा सह अन्य दोन महिला तलाठी कर्मचारी यांनी तहसिलदार यांच्या वाहनातून पाठलाग करुन ट्रक अडवला.

त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठीमध्ये वाद झाला. त्यानंतर नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठीसोबत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तलाठी निशा पावरा ही आदिवासी समाजाची असल्याने समाजावरून तिला नगरसेवक चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने आदिवासी समाजातून संताप व्यक्त होतोय.

दरम्यान व्हायरल व्हिडीओ मध्ये तहसीलदारांनी नेमलेल्या वाळू पथकाकडून ट्रक सोडवण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करत असल्याचा उल्लेख ही होतांना दिसत आहे.

पाठलाग करून वाळू ट्रक पकडला म्हणून मारहाण…

वाळू पथकातील तलाठी निशा पावरा ह्यांनी सांगितलं आहे की, अवैधरीत्या वाळू तपासणी चालू असतांना संबंधित वाळू भरलेल्या ट्रक कडे पास नव्हता. मालक येतोय असं सांगून दोन तास थांबवलं मात्र, ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. आम्ही पाठलाग करून ट्रक पकडला, नगरसेवक चौधरी आल्यानंतर त्यांनी अरेरावीची भाषा केली आणि मारहाण केली. आदिवासी असल्याने जाती वाचक शिवीगाळ केली. महिला कर्मचारी असूनही मारहाण केल्याचं निशा पावरा यांनी सांगितलं.

भाजप नगरसेवकाची महिला तलाठीला मारहाण, काय आहे प्रकरण वाचा

सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी तसेच जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. चौधरी यांनीही क्रॉस तक्रार केलीय की, वाळू ट्रक सोडवण्यासाठी पथकाने पैश्यांची मागणी केली होती. त्याबाबत चौकशी सुरू आहे. असं पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी सांगितलं.

Tags:    

Similar News