एसटी संपावर आज तोडगा निघणार का?
एसटी कर्मचारी संपाबाबत उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीकडून आज अहवाल सादर केला जाणार आहे. तर यावेळी एसटी महामंडळही आपली भुमिका मांडणार आहे. त्यामुळे आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे कर्मचारी, प्रवाशांसह सरकारचेही लक्ष लागले आहे.
मुंबई // गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीकडून आज अहवाल सादर केला जाणार आहे. तर यावेळी एसटी महामंडळही आपली भुमिका मांडणार आहे. त्यामुळे आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे कर्मचारी, प्रवाशांसह सरकारचेही लक्ष लागले आहे.
29 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू केला. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्तीची कारवाई केली. तर संपावर तोडगा काढण्यासाठी वेतनवाढही दिली. याबरोबरच संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला. शेवटी राज्य सरकारने खासगी प्रवासी वाहतुकीमार्फत सेवा देण्यास सुरूवात केली. मात्र तरीही कर्मचारी आपल्या भुमिकेवर ठाम आहेत.
विलिनीकरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने समिती नेमुन 12 आठवड्यात समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आज 20 डिसेंबर रोजी या समितीचा प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. तर एसटी महामंडळ आपली भुमिका मांडणार आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या संपावर आज तोडगा निघणार का? आणि एसटीची थांबलेली चाकं पुन्हा रस्त्यावर धावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.