प्रणव रॉय 'इंडिया' आणि विनोद दुआ 'भारत'
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जातो आहे. पण सामान्य माणसाला विनोद दुआ पत्रकार म्हणून का आवडायचे याचे विश्लेषण केले आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी....;
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जातो आहे. पण सामान्य माणसाला विनोद दुआ पत्रकार म्हणून का आवडायचे याचे विश्लेषण केले आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी....
"हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल.. विनोद दुआ गेल्यावर ते मला का आवडायचे आणि त्या आवडण्याची सुरुवात कधी झाली ? याचा मी विचार करू लागलो. तेव्हा लक्षात आले की विनोद दुआ सर्वसामान्य माणसाला आवडायला त्यांचे निवडणूक विश्लेषण कारणीभूत होते.... बहुदा त्याची सुरुवात १९८९ ला असावी.. विश्वनाथ प्रतापसिंग यांचे ग्लॅमर असलेली ती निवडणूक.. त्यावेळी दूरदर्शन नुकतेच भरात आले होते आणि प्रणव रॉय यांच्या कंपनीला लोकसभा निवडणूक विश्लेषणाचे काम दिले होते (त्यावेळीचे १७ लाख रुपये हे लक्षात आहे )
त्याकाळात ही कल्पनाच नवीन होती की देशभर जिल्ह्याजिल्ह्यात रिपोर्टर उभे करून live निवडणूक निकाल, संगणकाच्या सहाय्याने निवडणूक मतांची टक्केवारी, त्याचे विश्लेषण आणि स्टुडिओत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा..
त्यावेळी प्रणव रॉय इंग्रजीत बोलायचे प्रणव रॉय यांचे कठीण इंग्रजी त्यातही त्यांचे उच्चारही परदेशी पद्धतीचे अत्यंत हळू बोलायचे. त्यामुळे त्यांचे बोलणे समजत नसायचे आणि ते काय बोलतात याची जाम उत्सुकता मात्र असायची. अशावेळी विनोद दुआ नावाचे 'गाईड'( !!! ) अशावेळी सर्वसामान्य भारतीयांच्या मदतीला यायचे... प्रणव राय खूप वेळ जे कठीण इंग्रजीत बोलले ते अगदी थोडक्यात अतिशय गोड हिंदीत विनोद समजून सांगायचे.. त्यामुळे प्रणव रॉय हा इंडिया तर विनोद दुआ भारत असे वाटायचे..राहणीमान ही तसेच...प्रणव रॉय थ्री पीस मध्ये तर विनोद आपले भारतीय जाकीट व नेहरू शर्टमध्ये... एकदम आपला माणूस वाटायचे. प्रणव रॉयचा त्या विद्यार्थी दशेत इतका राग यायचा की हा माणूस इतका कठीण का बोलतोय ? आणि विनोद दुवा मात्र हसत-हसत अगदी छान पैकी हिंदीत त्यांचे म्हणणे सांगायचे... त्यात काही राजकीय नेते इंग्रजीतून बोलायचे आणि बराच वेळ इंग्रजी चालले की विनोद दुवांना प्रणव इशारा करायचे आणि विनोद त्यांचे म्हणणे अगदी थोडक्यात सांगायचे..
विनोदचे कौतुक त्यांच्या हिंदीसाठी करावे की सारांश सांगण्याबद्दल करावे असा प्रश्न पडायचा कारण कधी कधी लांबलचक बोललेल्या परिच्छेदाचे ते एक ते दोन वाक्यात सारांश सांगायचे इतकी त्यांची हुकूमत होती... विनोद यांची ही पहिली ओळख कायमस्वरूपी मनात राहिली प्रणव रॉय इंडिया होते तर विनोद भारत होते इंडिया विरुद्ध भारत ही मांडणी एकत्र अनुभवत यायला सतत निवडणूक यावी असे वाटावे इतका तो सुंदर अनुभव होता...सामान्य माणसात विनोद यांच्या लोकप्रियतेची ही सुरुवात होती...की जी पुढे उंचावतच गेली