जळगाव जिल्ह्यात म्युकर माइकोसिस आजारांची 13 व्यक्तींना लागण, 6 जनांचा बळी

Update: 2021-05-13 14:08 GMT

राज्यात कोरोना पाठोपाठ आता म्युकर माइकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार हातपाय पसरत आहे. हा आजार दुर्मिळ आणि जुनाच आजार आहे. मात्र, कोरोनामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने त्याने डोकेवर काढले आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टिरॉइड्समुळे हा आजार बळावत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात 6 जणांचा बळी गेला आहे.

म्युकर मायकोसिस आजाराबाबत माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर या आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. सद्यस्थितीत 13 रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यापैकी 6 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 3 महिला रुग्ण होत्या. सद्यस्थितीत 7 रुग्णांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार केले जात आहेत. समोर आलेल्या रुग्णांमध्ये 9 जणांना मधुमेह आजार होता, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

नाक-कान-घसा तज्ञ डॉ. अनिता भोळे यांनी सांगितले की, म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार जुनाच आहे. परंतु, आता कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने तो बळावत आहे. कोरोनाच्या उपचारात रुग्णांना लागणाऱ्या स्टिरॉइड्स औषधांमुळे हा आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. या आजाराची प्रमुख लक्षणे अशी की, चेहऱ्याच्या एका भागाला अचानक सूज येणे, गाल सुजणे, डोळा सुजून बाहेर येणे, तोंडात किंवा नाकात फंगल इन्फेक्शन होणे, दात अचानक हलू लागणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. विशेष करून मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह असलेल्यांना कोरोना झाला असेल आणि त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले असेल तर हा म्युकर मायकोसिस वेगाने वाढत जातो, असे डॉ. भोळे म्हणाल्या.

Tags:    

Similar News