अफगाणिस्तानला संकटात सोडून राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी का पळाले?
तालिबानने काबुल आपल्या अखत्यारीत घेतल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले. २५ वर्षांपुर्वी असं काय घडलं होतं ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना देश सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला...
तालिबानने काबुल आपल्या अखत्यारीत घेतल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले. अशरफ घनी देश सोडून गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवन पूर्णत: ताब्यात घेतलं. तालिबानचा प्रमुख मुल्ला अब्दुल घनी बरादर हा अफगाणिस्तानचा सत्ताधीश म्हणून सुत्र हाती घेऊ शकतो. तब्बल २५ वर्षांपूर्वी देखील तालिबानने अफगाणिस्तानवर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं होतं आणि तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्लाह यांची निर्दयीपणे हत्या करुन त्यांचा मृतदेह एका खांबाला लटकावला होता.
नजीबुल्लाह यांचं कम्युनिस्ट विचारसरणीचं सरकार
अफगाणिस्तानमध्ये १९८४ साली पीपल डेमोक्रॅटिक पार्टीची सत्ता होती. हा कम्युनिस्ट विचारसरणीचा पक्ष होता. सोव्हिएत रशियाच्या मदतीने नजीबुल्लाह हे त्यावेळी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती झाले होते. त्यावेळी त्यांनी देशात अमुलाग्र बदल करायला सुरुवात केली. नजीबुल्लाह यांनी अफगाणिस्तानची राज्यघटना निर्माण केली आणि देशाचे नाव रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान असं केलं. त्यांनी महिलांना अनेक हक्क प्रदान केले. सर्वात महत्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता या तत्वाची अंमलबजावणी सुरु केली. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांच्याविरूध्द मोठी नाराजी होती. त्यामुळे १९९० च्या दशकात उत्तर पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तसेच कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानला स्थानिक जनतेचं मोठं समर्थन मिळू लागलं.
पाकिस्तान आणि अमेरीकेचा छुपा पाठिंबा
सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर अफगाणिस्तानला मिळणारी रसद बंद झाली. त्यावेळेस सोव्हिएत संघाच्या फौजा अफगाणिस्तानमधून माघारी जात होत्या. पाकिस्तान आणि तालिबान या दहशतवादी गटाला अमेरिकेची मोठी रसद सुरु होती. त्यावेळीदेखील तालिबानने अफगाणिस्तानच्या कंदहार शहराला आपले पहिले केंद्र बनवले. त्याचवेळी अमेरिकेच्या आणि पाकिस्तानच्या छुप्या पाठिंब्याच्या मदतीने तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं.
सोव्हिएत फौजा गेल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या नजीबुल्लाह सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढला होता. त्यामुळे नागरिकांनी तालिबानच्या सत्तेचे जोरदार स्वागत केले. परंतू सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबानने आपला कट्टरतावादी रंग दाखवण्यास सुरुवात केली. तालिबानने कठोर इस्लामिक कायदे लागू केले. चोरी ते हत्येच्या गुन्ह्यातील दोषींना भरचौकात शिक्षा दिली जाऊ लागली. त्याशिवाय अनेक रुढीवादी नियम लादले जाऊ लागले. देशात टीव्ही, संगीत यांच्यावर बंदी घालण्यात आली. मुलींवर शाळेत जाण्यासपासून निर्बंध लावण्यात आले. महिलांसह पुरुषांवरही अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले.
राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांची निर्दयी हत्या...
नजिबुल्लाह यांनी शॉर्टव्हेव रेडिओच्या माध्यमातून युनायटेड नेशन्सकडे मदत मागितली. पण त्यावेळी त्यांना कोणतीही मिळाली नाही. काबुलवर तालिबान्यांनी नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती नजिबुल्लाह यांना आपल्याला शरण येण्यास सांगितलं होतं. पण नजिबुल्लाह यांनी तसं करण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर तालिबान्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले. तालिबान्यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांना एका ट्रकच्या मागे बांधून रस्त्यावरुन फरफटत नेलं आणि नंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी राष्ट्रपतींच्या मृतदेहाला एका विजेच्या खांबाला लटकावलं. महत्वाचं म्हणजे त्याच खांबावर राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांच्या भावाचा मृतदेह लटकत होता.
पुन्हा एकदा तालिबान्यांनी अफगाणिस्तावर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे. आता त्या देशातील महिला, बालके, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याबद्दल जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.