काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबईत येणार तेव्हा जमावबंदी लावणार का? - ओवेसी
मुंबई // एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची औरंगाबाद येथून निघालेली तिरंगा रॅली मुंबईत दाखल झाली. या रॅलीदरम्यान पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमआयएमची मुंबईत चांदिवली येथे रॅली पोहोचली. तिथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली. यावेळी भाषण करताना ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी करत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.
मुस्लीम आरक्षणासाठी या रॅली आयोजन करण्यात आले होते. तिरंगा रॅली काढली म्हणून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला काय त्रास झाला की त्यांनी जागोजागी ही रॅली अडविण्याचा प्रयत्न केला. मला या गोष्टीची खंत वाटते असं ओवेसी म्हणाले. तर शिवसेना 24 तासात राष्ट्रवाद म्हणून दोन हजारवेळा घोषणा करते तीच शिवसेना तिरंगा हाच आपला राष्ट्रवाद आहे हे कसं विसरते? तुम्हाला मुसलमानांचा द्वेश असू शकतो, पण तिरंगा उचलल्यावर द्वेश वाटतो.तिरंगा आमच्या पूर्वजांच्या आहुतींचा सन्मान आहे", असं ओवेसी म्हणाले.
दरम्यान , मुंबईत कलम 144 लावण्यावरून ओवेसी यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी या महिन्यात मुंबईचा दौरा करणार आहेत. तेंव्हा जमावबंदी लावणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.