राज्यात मास्कसक्ती होणार का? राजेश टोपे यांचं मोठं विधान
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरूवात झाली असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क सक्तीबाबत दिलासा दिला आहे.
कोरोनाची लाट ओसरल्याची घोषणा करत राज्यात गुढीपाडव्यापासून कोरोना निर्बंध हटवले. मात्र त्यानंतर महिनाभरातच राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्कसक्ती करणार का? अशी चर्चा सुरू होती. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्कसक्तीबाबत मोठं विधान केले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोडावल्यामुळे कोरोनावरील निर्बंध हटवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. तर सर्वसामान्य नागरिकांचे जीवन पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली होती. देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरूवात झाल्यामुळे दिल्लीतही मास्क सक्ती करण्यात आली आहे.
राज्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाल्यामुळे राज्यात मास्कसक्ती करणार का? अशी चर्चा होती. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ होत असली तरी काळजीचे कारण नाही. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे राज्यात मास्कची सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायला हवा. याबरोबरच नागरिकांनी खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
राज्यात किती कोरोना रुग्ण वाढले?
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा मंदावलेला आकडा पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. तर बुधवारी राज्यात 162 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यात फक्त मुंबई शहरातील 98 रुग्णांचा समावेश आहे. याबरोबरच सध्या 690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिल्लीतही कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. तर बुधवारी दिल्लीत 1009 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात देशात 2067 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.