सांगली जिल्ह्यातील विटा येथील सूर्यनगरच्या बंडू सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या शेळ्या चोरीला गेल्याची फिर्याद विटा पोलिसात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सक्त सूचना विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिल्या होत्या. या सूचनेनुसार गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चौकशी केली असता दोन अनोळखी इसम नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून जाताना आढळले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आटपाडी तसेच विटा येथे घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींकडून 6 लाख 53 हजाराचा पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये अशोक लेलँड कंपनीची चारचाकी गाडी, दहा शेळ्या, एक दुचाकी तसेच रोख सात हजाराचा समावेश आहे. सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनात विटा पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वात झालेल्या या कामगिरीबद्दल विटा पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या गुन्ह्यासोबतच इतरही अनेक गुन्ह्यांची उकल करत विटा पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे.