रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला हिंसक वळण ; तहसीलदारांची गाडी पेटवली

Update: 2021-11-20 02:31 GMT

Photo courtesy : social media

बुलढाणा  :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या 17 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र, आंदोलनाच्या चौथ्या दिवशीच आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. तुपकर यांची तब्येत खालावल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट बुलढाण्याच्या तलसीलदारांची गाडीच पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली.

दरम्यान , प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्याने आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली, यावेळी पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या.

दरम्यान , तारांबळ उडालेल्या प्रशासनाने सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळले परंतु सध्या तुपकरांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेतकरी पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने तुपकरांच्या घरासमोर जमत आहे. सध्या तुपकरांच्या घरासमोर तणावपूर्ण शांतता आहे.

Tags:    

Similar News