अमरावतीत बंदला हिंसक वळण; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं जनतेला शांततेच आवाहन
त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रातही काही शहरांमध्ये पडताना दिसत आहे. महाराष्ट्रात अमरावती येथे शुक्रवारी झालेल्या हिंसाचार आणि दगडफेकीच्या निषेधार्थ आज भाजपने शहर बंदची हाक दिली आहे. आज सकाळी दहा वाजता शहरातील प्रमुख चौकात हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना काहींनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांवर दगडफेक केली.
त्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या दगडफेक सुरू असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. गर्दी पाहता ग्रामीण भागातूनही शहरात फौजफाटा मागवण्यात आला आहे.
त्रिपुरातील जातीय दंगलीच्या निषेधार्थ काल महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली होती. रझा अकादमी नावाच्या संस्थेचा यात सक्रिय सहभाग होता. या दरम्यान नांदेड, मालेगाव आणि अमरावतीमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच दोन पोलिस अधिकाऱ्यांसह डझनभर पोलिस जखमी झाले. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
अमरावती या भागात झाला हिंसाचार
शुक्रवारी एका समाजाने जाहीर केलेल्या बंद दरम्यान, अमरावतीतील चित्रा चौक, चौधरी चौक येथून मोर्चा काढणाऱ्या काही जमावाने दुकानांवर दगडफेक केली होती. त्यानंतर काही व्यावसायिकांसह भाजप आणि बजरंग दलाचे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ दुपारी 3 वाजता अमरावती जिल्हा दंडाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यासाठी सात संघटनांनी शहर पोलिसांकडे लेखी परवानगी मागितली होती. मात्र, त्यात कुठेही मोर्चे काढण्याचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे घटनास्थळी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात केवळ 250 पोलीस तैनात होते. मात्र, त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीननंतर हजारो लोकांचा मोर्चा पाहून पोलिसांनी तत्काळ अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.