औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून पदवीधर निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राजकीय पक्षांकडून विभागापासून तर थेट गावातील एक-एक मतदाराच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात एक असं गाव आहे, जिथे अख्या गावात फक्त दोनच पदवीधर मतदार आहे. विशेष म्हणजे दोघेही पती-पत्नी आहे.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील 3500 लोकसंख्या असलेल्या रांजणगाव दांडगा गावात फक्त दोनच पदवीधर मतदार आहेत. शकील साहेबलाल शेख आणि त्यांची पत्नी नौवशाद शकील शेख असे त्याचे नाव आहे. त्यांनी बालानगर मतदान केंद्रात आज दुपारी 12 वाजता मतदान केलं.
एकीकडे आपण साक्षरतेच्या मोठं-मोठ्या गप्पा मारतो, दुसरीकडे असे विदारक चित्र आहे. संपूर्ण गावात फक्त दोन लोकांची पदवीधरसाठी नोंद असणे ह्यातूनच आपल्या व्यवस्थेचा खरा चेहरा समोर येतो. त्यामुळे शिक्षणाच्या प्रचाराची आणि प्रसाराची आणखी गरज असल्याचे सुद्धा यातून स्पष्ट होते.
औरंगाबाद जिल्ह्यात 206 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. तर दुपारी 12 वाजेपर्यंत 20.48 टक्के मतदान झालं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लोकांनी पुढे येऊन मतदान करावे असे आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे.