Maharashtra Updated Covid 19 Guideline : राज्य सरकारचा पुन्हा निर्बंध गोंधळ, आता सुधारित आदेश जारी
राज्यात निर्बंधांची सुधारीत नियमावली जारी, जीम, ब्युटी सलून 50 टक्के क्षमतेसह राहणार खुले
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्वभुमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामध्ये जीम, ब्युटी सलून, स्विमिंग पूल, स्पा आणि वेलनेस सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने सुधारीत आदेश जारी केला आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने रविवारी रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामध्ये रात्री 11 ते 5 संचारबंदी तर दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तर खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम किंवा 50 टक्के क्षमतेची परवानगी देण्यात आली आहे. याबरोबरच लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी आहे. कॉलेज, शाळा या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तर हेअर कटींगची दुकाने 50 टक्के क्षमतेसह तर पर्यटनस्थळं, पार्क, प्राणीसंग्रहालय, किल्ले, वस्तुसंग्रहालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट, नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यात येणार आहेत. तर रात्री 10 ते सकाळी 8 या कालावधीत सिनेमागृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच स्विमिंग पुल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावरून ब्युटी पार्लर चालकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राज्य सरकारने सुधारीत आदेश जारी करत जीम व ब्युटी सलून 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.