जगातील सर्वाधिक बेरोजगारी भारतात, जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा
कोरोनानंतर देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढतच गेले आहे. त्यातच हा आकडा आता तब्बल 24 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे सध्या भारतात जगातील सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा दावा जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केला आहे.;
भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा कितीही मजबुत असला तरी वाढत्या विभाजन आणि ध्रुवीकरणामुळे देशाच्या विकासाचा पाया ढासळत आहे. त्यामुळे देशात बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. तर सध्या देशातील बेरोजगारीचा दर हा 24 टक्क्यांवर पोहचला असून हा आकडा जगातील सर्वाधिक असल्याचा दावा जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केला आहे.
कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या आर्थिक धोरणांबरोबरच देशातील लोकांच्या विश्वासावर अवलंबून असतो. मात्र सध्या देशात सुरू असलेले विभाजन आणि धार्मिक ध्रुवीकरण यांमुळे देशाच्या विकासाला फटका बसत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ बसू यांनी व्यक्त केले.
देशातील मोठ्या प्रमाणावर असलेला कुशल कामगार, मोठा उद्योजक वर्ग आणि जीडीपीच्या गुणोत्तरात जास्त गुंतवणूक होत असल्यामुळे देशाचा पाया मजबूत आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये देशातील कुशल कामगारांचे प्रमाण कमी होत असल्याने त्याचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे.
देशातील किरकोळ महागाईत वाढ झाल्याने शेतकरी, लहान व्यापारी आणि कामगार यांना थेट मदत देऊन सरकारने महागाईचा दर नियंत्रणात आणावा. तसेच सध्या ज्या प्रमाणात महागाई वाढत आहे. त्या प्रमाणात 90 च्या दशकात महागाईने उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतरच्या गेल्या 24 वर्षात एवढी महागाई पुन्हा झाली नसल्याचे दिसत आहे.
याबरोबरच कोरोना महामारीपाठोपाठ सुरू असलेले रशिया युक्रेन युध्द या महागाईला कारणीभूत आहे. तर या युध्दामुळे भारतात पुरवठा करण्यात येणाऱ्या वस्तुंच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे रशिया युक्रेन युध्दामुळे निर्माण झालेली परिस्थिती भारताच्या नियंत्रणात नसली तरी यामुळे देशात निर्माण होत असलेल्या महागाईच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने योग्य पाऊलं उचलायला हवीत, असा सल्ला कौशिक बसू यांनी दिला आहे.