मागील वर्षभरात पुन्हा एकदा उत्तरप्रदेशच लखीमपूर खेरी जिल्हा चर्चेत आला आहे. गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर लखीमपूर खेरी जिल्ह्यात दोन दलित अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांचे मृतदेह झाडावर लटकवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
बुधवारी 14 सप्टेंबर ला दोन दलित अल्पवयीन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. दोघींचं वय अनुक्रमे 15 आणि 17 होतं. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून घेतले. जवळपास 3 तास चाललेल्या या प्रक्रियेचं चित्रीकरण करण्यात आलं. शवविच्छेदनात या दोन्ही मुलींवर सामूहिक बलात्कार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी आणि पोलिसांत चकमक
याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास केला असता 6 जणांची नावं समोर आली. त्यांना अटक करायला गेले असताना पोलिसात आणि आरोपींमध्ये चकमक झाली. या चकमकीत आरोपी जुनेद हा जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणी छोटू, जुनेद, सोहेल, हफिजुल रेहमान, करिमुद्दिन आणि आरिफ या सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी एक दुचाकी, गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त केली आहेत. या सर्व आरोपींनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे अशी माहिती लखीमपूर पोलीस ठाण्याचे अधीक्षक संजीव सुमन यांनी दिली आहे. या दोन्ही बहिणींवर सामूहिक बलात्कार केला गेला. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. आणि. त्यांचे मृतदेह झाडाला लटकविण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पिडीत कुटुंबीयांची फाशीची मागणी
पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशी, घरातील एकाला सरकारी नोकरी आणि भरपाईची मागणी केली होती. मागणी मान्य होईपर्यंत त्यांनी दोन्ही बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली होती. स्थानिक प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी या दोन्ही बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
25 लाखांची मुख्यमंत्र्यांची घोषणा
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पिडीत कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शिवाय या कुटुंबीयांना
एक पक्क घर आणि काही शेत जमीन देण्याचेही निर्देश दिले आहे. शिवाय या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून महिन्याभरात या गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं.
विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिल्कीस बानो प्रकरणाचा आधार घेत "बलात्कारातील आरोपींना सोडून त्यांचं स्वागत करणाऱ्यांकडून महिला सुरक्षेची अपेक्षाच करू शकत नाही", अशी टीका केली. तर "कायदा सुव्यवस्थे बद्दलचे सरकारचे दावे फोल ठरले आहेत", अशी टीका बसपा नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केली.