पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचा फोन, काय बातचीत झाली फोनवर;

Update: 2022-02-26 13:54 GMT

रशिया आणि युक्रेन च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधानांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीबद्दल तपशीलवार माहिती दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनमध्ये १ लाख सैनिक घुसल्याची माहिती देत हे सैनिक घरांवर अंधाधुंद गोळीबार करत असल्याचं सांगितलं. तसंच युएन मध्ये युक्रेन ला राजकीय पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.


चालू असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तीव्र दुःख व्यक्त केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचार तात्काळ थांबवावा आणि संवादाकडे परत यावे असं आवाहन करत शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही प्रकारे योगदान देण्याची तयारी भारताच्या वतीने दर्शविली आहे.

पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल आणि सुरक्षेबाबत भारताची चिंता व्यक्त केली. त्यांनी युक्रेनच्या अधिकार्‍यांकडून भारतीय नागरिकांना त्वरीत आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सोयीची मागणी युक्रेनच्या अध्यक्षतेकडे केली आहे.

दरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना फोन केला होता. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनसंदर्भातील घडामोडींची माहिती दिली.

रशिया आणि नाटो देशांमध्ये असलेला तणाव फक्त चर्चेच्या माध्यमातूनच सोडवला जाऊ शकतो, असे मत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी बोलताना व्यक्त केले. तसेच मोदी यांनी तातडीने हिंसाचार थांबवून राजनैतिक वाटाघाटी या चर्चेच्या माध्यमातून करण्याचे आवाहन पुतिन यांना केले. तसेच सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही मोदी यांनी म्हटले.

Tags:    

Similar News