Russia vs Ukraine : रशियाचे किती सैनिक मारले गेले? रशियानेच दिली कबुली

Update: 2022-03-03 12:43 GMT

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून आता ७ दिवस झाले आहेत. या हल्ल्यामध्ये रशियाने आता युक्रेनच्या खार्कीव्ह या महत्त्वाच्या भागावर ताबा मिळवला आहे. इथे गेल्या २४ तासात सुमारे ३४ नागरिक ठार झाल्याची माहिती, युक्रेनच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच खेरसा शहरावरही ताबा मिळवला आहे. पण या दरम्यान गेल्या सात दिवसात रशियाचे ७ हजार सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. पण रशियाने युक्रेनचा दावा फेटाळला आहे आणि रशियाचे ४९८ सैनिक मारले गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ठार झालेल्या सैनिकांबाबत रशियाने गेल्या सात दिवसात पहिल्यांदाच अधिकृतपणे माहिती दिली आहे.


 



रशियाने दाखवली चर्चेची तयारी

या दरम्यान युक्रेनची राजधान कीवकडे आता रशियाचे सैन्य निघाले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनसोबत चर्चेची तयारी दाखवली आहे, पण आपले हल्ले रोखणार नसल्याची भूमिका घेतली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशिया युक्रेनमधील हल्ले रोखण्यासाठी चर्चेला तयार आहे, पण युक्रेनमधील लष्करी सुविधा नष्ट करण्यावर आमचा भर असेल असा दावा त्यांनी केला आहे. रशियाने आपल्या मागण्या चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये युक्रेनला दिल्या होत्या, आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, अशी माहिती सर्गेई लावरोव्ह यांनी दिली आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियाला घेरण्यासाठी युक्रेनमध्ये लष्करी हालचाली वाढवल्या आहेत तसेच त्यासाठीच युक्रेनला शस्त्र पुरवठा केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.




 



 


आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून चौकशीला सुरूवात

दरम्यान युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायासाठी धाव घेतल्यानंतर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये युद्धामधील गुन्हे तसेच नरसंहाराबाबत चौकशी करण्यात येणार आहे, यामुळे रशियाचे अनेक बडे लष्करी अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक ठार झाले आहेत आणि मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. या सगळ्याबाबत ठोस पुरावे गोळा करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.



दरम्यान युक्रेनमधून जवळपास १० लाख लोकांनी जवळच्या देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे देण्यात आली आहे. तसेच या युद्धात युक्रेनमधील सुमारे २ हजार नागरिक ठार झाल्याचेही सांगण्यात येत आहे.


 



पुतीन यांच्याविरोधात रशियामध्येही आंदोलन

दुसरीकडे जगभरातून रशियाचा निषेध होत असताना आता युद्ध थांबण्यासाठी रशियामध्येही अनेकांनी पुतीन यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युद्धाला विरोध करत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनाही रशियन पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

Tags:    

Similar News