Russia VS Ukraine War : युक्रेन-रशियामध्ये होणार चर्चा, तर दुहेरी डाव टाकत युरोपिय महासंघाचा रशियाला दणका

Update: 2022-02-28 04:19 GMT

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आता युरोपिय महासंघाने रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या SWIFT प्रणालीतून रशियन बँकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता युक्रनेच्या मदतीसाठी युरोपिय महासंघाने शस्त्रास्त्रांसाठी पुरवठा करण्याकरीता आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती युरोपिय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेअन यांनी दिली आहे. कोणत्याही एखाद्याला देशाला शस्त्र खरेदीसाठी युरोपिय महासंघाने अशाप्रकारे आर्थिक पुरवठा करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते आहे.

युरोपियन युनियमधील अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा जाहीर केला आहे, पण रशियावर निर्बंध लादण्या व्यतिरिक्त युक्रेनसाठी कोणतीही ठोस मदत जाहीर करण्यात आली नव्हती. पण आता युरोपिय महासंघाने शस्त्रास्त्र खरेदीसाठी थेट अर्थपुरवठा करण्याचा निर्णय हा युक्रेनसाठी दिलासादायक ठरणार आहे. तर एकीकडे रशियाची आर्थिक कोंडी करण्यासह युरोपिय राष्ट्रांनी आता या निर्णयामुळे रशियाची दुहेरी कोंडी केली आहे.

दुसरीकडे पुतीन यांनी युक्रेनशी चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरी रविवारी आपल्या अण्वस्त्र टीमला सज्ज राहण्याचे आदेशही दिले. त्यामुळे निर्माण झालेल्या तणावात भर देखील पडली आहे. युक्रेननेही आता कोणत्याही पूर्व अटीशिवाय रशियाशी चर्चेची तयारी दाखवली आहे. युक्रेन-बेलारुसच्या सीमेवर युक्रेनचे शिष्टमंडळ रशियाच्या शिष्टमंडळाशी चर्चेला तयार आहे, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे. त्यामुळे या चर्चेतून काहीतरी सकारात्मक तोडगा निघतो का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News