Shashikant Varishe : पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणी डॉक्टरवरही होऊ शकते कारवाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा इशारा
रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूप्रकरणाची पालकमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे.;
रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणावरून राज्यात खळबळ उडाली आहे. शशिकांत वारिशे यांचा मृत्यू नसून हा खून असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गंभीर दखल घेतली आहे.
रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत वारिशे (Journalist Shashikant Varishe) यांनी पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar) यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो छापल्यानेच त्यांचा खून केल्याचा आरोप केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी खोटं नाटक करून स्वतःला अॅडमीट करून घेतल्याचे म्हटले जात आहे. त्याबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना विचारले असता, उदय सामंत म्हणाले, जर आरोपीने खोटं नाटक करून स्वतःला अॅडमीट करून घेतलं असेल तर या प्रकरणाची चौकशी होईल. तसेच ज्या डॉक्टरांनी जाणीवपुर्वक अशा प्रकारचे कृत्य केले असेल त्या डॉक्टरवरही कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा उदय सामंत यांनी दिला.
पुढे बोलताना सामंत म्हणाले, अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ले होणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. यामध्ये संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीवर 302 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्या व्यक्तीचे कुणासोबत फोटो समोर आले म्हणून ज्याच्यासोबत फोटो आहेत, तो व्यक्ती आरोपी होत नाही, असंही उदय सामंत म्हणाले. (Uday Samant comment on accused photo)