जम्मू : पूँछ जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून अतिरेक्यांशी चकमक सुरू असून, त्यांना ठार मारण्यासाठी पॅरा कमांडो व लढाऊ हेलिकाॅप्टर्सची मदत घेतली जात आहे. दरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. घनदाट जंगलात अतिरेकी लपल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात सैनिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अतिरेक्यांवर उखळी तोफा आणि रॉकेटस् डागले जात आहेत. या चकमकीत मागील पाच दिवसांत लष्कराच्या ७ जवानांना वीरमरण आलं आहे, तर गुरुवारी रात्री रायफलमॅन विक्रमसिंह नेगी (२६) आणि रायफलमॅन योगंबर सिंह (२७, दोघेही रा. उत्तराखंड) शहीद झाले आहे. लष्कराने राजौरी-पूँछ महामार्गावर वाहतूक बंद केली आहे.दरम्यान राजौरी-पूँछ रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक विवेक गुप्ता यांनी सांगितले की, अतिरेक्यांच्या हालचालींवर आम्ही निर्बंध आणले आहेत. अतिरेक्यांचा हा गट दोन-तीन महिन्यांपासून येथे होता.घनदाट जंगल व डोंगराळ भाग असल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. गुरुवारी रात्री जवान नार खास जंगलात अतिरेक्यांना शोधत होते, तेव्हा झाडांमागे लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. यात दोन रायफलमॅन जवान शहीद झाले. त्यानंतर घनदाट जंगलात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले.