Budget 2022 : आज अर्थसंकल्प, राज्यातील नागरीकांची अपेक्षापुर्ती करणार का?
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. तर आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे.;
प्रचंड राजकीय गदारोळ सुरू असताना आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत.
अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खास विधिमंडळात आले होते.अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक मोठा खल झाला. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सन 2021-22 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. सन 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र समोर आल्याने राज्य सरकरला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी विकासदर घसरला होता. शिवाय कृषी आणि विविध क्षेत्रांची पीछेहाट झाली होती, मात्र कोरोनाचे संकट हळूहळू दूर होऊ लागल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा आपली घोडदौड सुरू केली आहे.
विधानसभेतील वित्तमंत्री अजित पवार तर विधान परिषदेमध्ये वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई अर्थसंकल्पाची वाचन करतील. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. जवळपास दहा हजार कोटीपेक्षा जास्त महसूली तुट अपेक्षित असताना कराच्या माध्यमातून उत्पन्न वाढीचा प्रयत्न होईल असे एकंदरीत चित्र आहे.