उत्तरप्रदेशात मतदानाचा तिसरा टप्पा, पंजाबमध्ये सर्वच 117 जागांसाठी मतदान

उत्तरप्रदेश निवडणूकीचे दोन टप्पे पुर्ण झाले आहेत. तर आज 59 जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.

Update: 2022-02-20 02:58 GMT

उत्तरप्रदेश निवडणूकीचे दोन टप्पे पुर्ण झाले आहेत. तर आज 59 जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजपची तर पंजाबमध्ये चन्नी सरकारची सत्वपरीक्षा असणार आहे.

उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यात निवडणूकांची रणधुमाळी सुरू होती. त्यापैकी उत्तराखंड आणि गोव्यात मतदान पार पडले. तर पंजाबमध्ये रविवारी एकाच टप्प्यात 117 जागांसाठी मतदान पार पडत आहे. तर उत्तरप्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदान होत आहे.

पंजाब निवडणूकीत शेतकरी आंदोलनासह, पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी, अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्याचा आरोप, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारण, कॅप्टन अमरींदर सिंग यांचा राजीनामा आणि त्यांनी स्थापन केलेला नवा पक्ष, आम आदमी पक्षाने गेल्या निवडणूकीत 20 जागांसह विरोधी पक्षनेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदा सत्तेत येण्याचा चंग केजरीवाल यांनी बांधला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये 117 जागांसाठी सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. त्यातच 2 कोटी 14 लाख मतदार 1304 उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.

त्याबरोबरच भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहूजन समाज पक्ष यांनी प्रतिष्ठेची बनवलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात शेतकरी आंदोलनाशी संबंधीत असलेल्या जाट समाजाचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात मतदान पार पडले. तर दुसऱ्या टप्प्यात मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात मतदान पार पडले. यामध्ये 2017 च्या निवडणूकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र शेतकरी आंदोलन आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे या दोन्ही टप्प्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.

तिसऱ्या टप्प्यात पश्चिम उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांसह बुंदेलखंड आणि अवध प्रांतातील मतदार उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत. यामध्ये 59 जागांसाठी मतदान होत आहे. तर या यादवपट्ट्यात 2017 साली भाजपचे वर्चस्व राहिले असले तरी त्यामध्ये अखिलेश यादव यांनी आपली सीट राखत आपला करिश्मा कायम ठेवला होता. त्यातच काँग्रेसने देशभर गाजलेल्या हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणूकीला भावनिक मुद्द्याचा स्पर्श झाला आहे. तर काँग्रेसने लडकी हूँ लढ सकती हूँ अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तरप्रदेशातील यादवपट्टा कोणाला साथ देणार यासह, पंजाबमध्ये बहुरंगी लढतीत पंजाब कोणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र याबाबत 10 मार्च रोजी लागणाऱ्या निकालातूनच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

Tags:    

Similar News