“वाद नाही, चर्चा आहे..." थोरातांचे स्पष्टीकर

Update: 2024-10-22 06:51 GMT

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चांचा गोंधळ सुरू आहे. या संदर्भात महाविकास आघाडीने वारंवार स्पष्ट केले आहे की आमच्यात मतभेद नाहीत. आज काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीला नंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्याच्या आधी त्यांनी काही महत्त्वाचे विचार व्यक्त केले.

आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. विदर्भातील काही जागांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. मागील आठवड्यात रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी मविआच्या नेत्यांमध्ये जवळपास 10 तास चर्चा झाली, पण जागा वाटपाच्या मुद्द्यावर काही ठोस निर्णय झालेला नाही. महायुतीने 99 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरूच आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील मतभेदांमुळे काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चा करण्याची जबाबदारी दिली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “नाना पटोले यांना हटवून मला चर्चा करण्यासाठी नेमले असे काही नाही. आम्ही सर्वांनी एकमताने विचार केला आहे. आदरणीय पवार साहेबांबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता होती. चांगली चर्चा झाली असून काही जागांवर चर्चा सुरू आहे.”

आता चर्चा किती लवकर संपेल, याबाबत त्यांनी सांगितले की, “वाद नाही, चर्चा आहे. मविआमध्ये प्रत्येक पक्षाला जागांसाठी आग्रह धरण्याचा अधिकार आहे. लवकरात लवकर मार्ग काढू.” त्यांनी पुढे सांगितले की आज दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे, ज्यामध्ये शक्य तितक्या लवकर जागा वाटप जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

Tags:    

Similar News