रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले आहेत का? किरीट सोमैया यांच्या दाव्यातील सत्य
कोर्लईच्या सरपंचांनी किरीट सोमैया चे आरोप फेटाळले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुरूडमधील कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले असल्याचा आरोप केला होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमैया यांचा आरोप खोडून काढत रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले असतील तर मी राजकारण सोडेन, अशी घोषणा केली होती. त्याबाबत रश्मी ठाकरे यांची मुरूडमधील कोर्लई यांचे बंगले आहेत का? याची माहिती मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी माहिती घेतली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर मुरूडमधील कोर्लई येथे 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. मात्र त्याबाबत माहिती घेतली असता मुरूड कोर्लई येथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले नसून नारळाची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव असल्याचे दिसून आले. तर याबाबत कोर्लईच्या सरपंचाशी मॅक्स महाराष्ट्रने संवाद साधला.
सरपंचांनी केला मोठा खुलासा
अन्वय नाईक यांनी 2009 रोजी आमच्याकडे रिसॉर्ट बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. 2009 रोजी कच्ची घरे बांधली. मात्र, नंतर त्यांना रिसॉर्टची परवानगी मिळाली नाही. त्या जागेवर असलेली 11-12 घरे होती ती तोडून तेथे झाडे लावली. झाडे लावल्यानंतर 2014 ला त्यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांना रितसर विक्री केली. त्यानंतर 2015 ते 2019 या काळात त्यांच्यापैकी कुणीही इथे आलं नाही. 2019 मध्ये आम्ही वायकर यांना पत्र पाठवलं की, खरेदी करताना दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवलं की 2014 पासून ते 2019 पर्यंतची घरपट्टीची थकबाकी भरावी त्या संदर्भात रितसर आम्ही नोटीस पाठवली. त्यानंतर त्यांनी 2019 ला ही घरपट्टी आरटीजीएसने भरली.
घरपट्टी भरणा केल्यानंतर आम्ही ज्यावेळी त्या फार्महाऊसवर गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की, तेथे अशा प्रकारचं कुठलंही घर नसताना त्यांच्याकडून कर आकारणी केली आहे. त्यासंदर्भात आम्ही माहिती घेतल्यावर कळालं की, 2013-14 ला ही घरे तोडून तेथे झाडे लावण्यात आली. 2019 ला जी घरे नावावर केली आहेत ती 11 घरे आहेत. या 11 घरांचा टॅक्स ग्रामपंचातीने 2021पर्यंत घेतला. आमच्या लक्षात आल्यावर आम्ही प्रत्यक्षात जागेवर जाऊन वस्तूस्थितीची पाहणी केली आणि तेथे घर न आढळल्याने ती घरे आम्ही रद्द केली असंही कोर्लई गावाचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी म्हटलं. यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा दिला नसल्याचे कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.