सरकारीपेक्षा खासगी रुग्णालयांत महिलांच्या गर्भ पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचं प्रमाण अधिक

बीड जिल्ह्यात लॉकडाऊन काळामध्ये मागील पंधरा महिन्यांमध्ये तब्बल 651 महिलांच्या गर्भ पिशव्या काढण्यात आल्याची माहिती समोर आला आहे.या आकडेवारी नंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला आहे.

Update: 2021-08-09 11:38 GMT

बीड : कोरोना काळात राज्यभरात सर्वच ठिकाणी नॉन कोविडं शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. याचाच फायदा घेत बीडच्या खासगी डॉक्टरांनी गर्भपिशवी काढण्याचा सपाटा लावल्याची माहिती नुकत्याच आलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. लॉकडाऊन काळामध्ये मागील पंधरा महिन्यांमध्ये बीडमध्ये तब्बल 651 महिलांच्या गर्भ पिशव्या काढण्यात आल्याची माहिती समोर आला आहे.

महिलांच्या गर्भ पिशव्या काढण्याच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेचा विषय बनला आहे. जिल्ह्यातील गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण अद्यापही थांबलेले नाही, गरज नसतानाही काही महिलांनी परवानगी घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे येतात. अर्थातच या शस्त्रक्रियेसाठी महिलांना खासगी डॉक्टरांकडून शासकीय रुग्णालयाची परवानगी मागण्यास भाग पाडले जातं असल्याचे बोलले जात आहे. याबाबत बोलतांना बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे. मात्र, 2019-20 च्या तुलनेत 2020-21 मध्ये पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. साबळे यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात इतर शस्त्रक्रिया बंद असताना खासगी डॉक्टरांनी मात्र गर्भपिशवी काढण्याचा सपाटा लावला होता. या आधी देखील जिल्ह्यातील महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचा प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली, खासगी शस्त्रक्रिया करायची असेल तर जिल्हा शल्यचिकित्सक अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयातून एखादी महिला आली तरी तिची सरकारी रूग्णालयात पुन्हा तपासणी केली जाते. त्यानंतर परवानगी दिली जाते, खासगी डॉक्टरांकडून होणारी लूट थांबवावी यासाठी शासनाने प्रयत्न केले असले तरी आजही खासगी रूग्णालयातील हा आकडा मोठा आहे. मागील पंधरा महिन्यांत तब्बल 651 महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे. या सर्वांना परवानगी दिल्याची नोंद आहे. सरकार आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न जिल्ह्यासमोर आ वासून उभा असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News