योगेश कदमांच्या मतदार संघातील 'रूग्णांना' घ्यावा लागतोय डोलीचा आधार
खेड तालुक्यातील मौजे जैतापूर येथील पायरीचा माळ धनगरवाडीत मूलभूत गरजांपासून वंचित आहे, आजही रस्ता नसल्याने पायपीट करावी लागत आहे परंतू आजारी रुग्णासाठी डोलीतून नेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय या गावकऱ्यांकडे नाही.
खेड : तालुक्यात विकासाचा महापूर वाहत असल्याच्या वल्गना स्थानिक लोकप्रतिनिधी करत असताना, सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेली मौजे जैतापूर गावातील पायरीचामाळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही रस्त्याच्या मुलभूत सुविधा होण्यासाठी शासनदरबारी संघर्ष करत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत "एकही धनगरवाडी रस्त्याच्या मुलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही असे जाहीर सभांमध्ये वारंवार विधान केले होते". परंतु आमदारकीची टर्म संपत आली तरी स्थानिक आमदार महोदयांना धनगरवाड्यांचा विसर पडलेला आहे. आजही खेड तालुक्यातील अनेक धनगरवाड्या रस्त्याच्या मुलभूत सुविधांसाठी शासनदरबारी संघर्ष करत आहेत.
पायरीचामाळ धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजही आजारी रूग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांची भुमिपूजनांचे कार्यक्रम स्थानिक आमदार योगेश कदम, खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून सातत्याने सुरु आहेत. परंतु धनगरवाड्यांसाठी किमान कच्चे रस्ते करण्यासाठी निधी नाही. ही खेदाची बाब असल्याचं समाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे म्हणाले आहेत.
रात्नागिरी जिल्ह्यात अनेक धनगरवाड्या या विकासापासून कोसो दूर आहेत. या वाड्या वस्त्यानां पाच वर्षातून एकदाच लोकप्रतिनिधी भेट देत असतात. परंतू या गावकऱ्यांचा संघर्ष हा रोजचाच आहे. त्यामुळे या गावांना रस्ता, आरोग्य, पाणी अशा मुलभूत प्रश्न केव्हा सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.