पुढील आठवड्यात तेल उत्पादक देशांच्या ओपेक संघटनेची बैठक ; बैठकीकडे जगाचे लागले लक्ष

Update: 2021-10-30 04:24 GMT

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या खनिज तेलाचे दर कडाडले असताना पुढील आठवड्यात तेल उत्पादक देशांच्या ओपेक संघटनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. ओपेक या संघटनेत इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. 1960 साली ओपेक संघटनेची स्थापना करण्यात आली होती. जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या पुरवठ्यावर आणि किंमतीवर या संघटनेचे नियंत्रण आहे. त्यामुळे या संघटनेच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.या बैठकीत तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यास खनिज तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुढील आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे,यावेळी अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठवल्यास खनिज तेलाच्या पुरवठ्यात वाढ होईल. त्यामुळे खनिज तेलाच्या किंमती कमी होण्यास मदत होईल. परिणामी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव घटू शकतात.

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या शंभरी पार गेले आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी काल शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले होते. त्यानुसार पेट्रोलमध्ये 35 आणि डिझेलच्या किंमतीत 36 पैशांची वाढ झाली आहे. या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.44 रुपये इतका आहे. तर डिझेलसाठी 105.45 रुपये प्रती लिटर मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोलसाठी 108.64 आणि डिझेलसाठी 97.38 रुपये मोजावे लागत आहे.

Tags:    

Similar News