डोंबिवलीतील हत्या मासे विक्रीच्या वादातून नसून मालमत्तेच्या वादातून झाल्याचा संशय
कल्याण : डोंबिवलीत चार दिवसापूर्वी झालेली हत्या ही मच्छी विक्रीच्या वादातून नव्हे तर मालमत्तेच्या वादातून झाल्याचा संशय मृतकाच्या घरच्यांनी व्यक्त केला आहे. मृतकाच्या कुटुंबियांनी याबाबत कल्याण झोन- 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्व खंबाळपाडा परिसरात भानूदास उर्फ मुकुंद दत्तू चौधरी हे त्यांच्या वयोवृद्ध आईसोबत राहत होते. मुकुंद यांच्या वहिनीचा मच्छी विक्रीचा व्यवयास आहे. वहिनीकडे हितेश उर्फ काल्या नकवाल हा तरुण काम करतो. मुकुंद याने अनेकवेळा हितेश याला वहिनीकडे काम करु नये याबाबत धमकावले होते. मात्र , हितेश काही केल्या ऐकत नव्हता. शनिवारी संध्याकाळी मुकुंद याने पुन्हा हितेशला आपल्या शेताकडे येण्यास सांगितले. हितेश त्याठिकाणी पोहचला. मुकुंद याने त्याच्या जवळील तलवार बाहेर काढली. हितेशला तलवार दाखवित आत्ता तू काम सोडले नाही तर याच तलवारीने मारून टाकेन असे धमकावले . या दरम्यान हितेश आणि मुकुंद यांच्यात वाद झाला. संतापलेल्या हितेशने मुकुंदच्या हातातील तलवार हिसकावून मुकुंदवर वार केले. या हल्ल्यात मुकुंद जागीच ठार झाला. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी हितेश नकवाल याला अटक केली आहे. मात्र, याप्रकरणी मयत मुकुंद चौधरी यांच्या घरच्यांनी ही हत्या मच्छी विक्रीवरून हा वाद झालेला नसून आपल्या काकाच्या मालमत्तेसाठीच मोठ्या काकाच्या मुलांनी त्याची हत्या केल्याचा आरोप मुकुंद चौधरी यांचा पुतण्या संदेश याने केला असून आपल्या काकाची संपत्तीसाठी हत्या करणाऱ्या आरोपीना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत त्यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना निवेदन दिले आहे.