दिल्ली हिंसाचाराचा मास्टरमाईंड दीप सिध्दु अटकेत
लोकशाही मार्गानं शांततेत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याठी प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना नियोजित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर नेऊन शेतकऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न करण्याचा आरोपी दीप सिद्धूला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.;
२६ जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू फरार होता. ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना नियोजित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर नेण्याचा तसंच शेतकऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न केल्याचा सिद्धू याच्यावर आरोप आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचार प्रकरणात १२७ जणांना अटक झाली असून याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हरप्रीत सिंह (३२ वर्ष), हरजीत सिंह (४८ वर्ष), धर्मेंद्र सिंह (५५ वर्ष) यांनाही अटक केलीय. सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजद्वारे पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दीप सिध्दु भाजपचे खासदार सनी देओल यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाले होते.
फरार झाल्यानंतर सिद्धू सोशल मीडियाद्वारे आपले व्हिडिओ पोस्ट करत होता. आपल्या एका जवळच्या मित्राच्या मदतीनं तो हे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या व्हिडिओंद्वारे आपण निर्दोष असल्याचा दावा सिद्धू करत होता. दीप सिद्धूला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या अनेक टीम्स पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शोध घेत होत्या. अखेर दीप सिध्दु पोलिसांच्या जाळ्यात सापडला त्याला आता न्यायालयात सादर करणार आहेत.