जिल्हा बँकेतील ३ मतं फोडण्यासाठी चाळीस खोकेंचा इफेक्ट अमरावती जिल्ह्यात दिसला - आ. यशोमती ठाकूर
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला जोरदार सुरुवात झाली असुन आजही आधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत तर आमदार निधी पुरवणी मागण्यातून विरोधकांना निधी मिळतं नसल्याने विधीमंडळात विरोधक आक्रमक होत आहेत, त्यातच आता काँग्रेसच्या नेत्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की "जिल्हा बँकेची निवडणूक झाली. जवळपास सतरा ते वीस वर्षापासून ही जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात होती. पण कालच्या निवडणुकीमध्ये तीन मतं आमची फुटली. आणि ते तीन मतं फोडण्यासाठी चाळीस खोकेंचा परिणाम अमरावती जिल्ह्यामध्येही दिसला. म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या भावनांसोबत हा जर खेळ होणार असेल, तर शेतकरी माफ करणार नसल्याचं" आमदार ठाकूर म्हणाल्या.
सरकारकडून पुरवणी मागणी आणि विरोधकांना मिळणाऱ्या निधीवर आमदार ठाकूर पुढे म्हणाल्या की " काही लोक आमच्या सोबतचे सत्तेत बसले होते. महाराष्ट्राला एवढं अस्थिर करण्याचं काम झालं आहे. एक दोन लोकांना निधी मिळतो बाकीच्यांना निधी द्यायचा दिला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या आमदारांना काही दिलं नाही. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे की नको असा थेट प्रश्नच यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, पाऊस पडताना विशिष्ट मतदार संघात पडतो का? ज्या ठिकाणी तुम्ही निधी टाकत नाहीत त्याठिकाणी लोकांचे हाल होत आहेत.