Breaking News | महाविकास आघाडीची चिंता वाढणार, वंचित आघाडीचा एकला चलो रे चा नारा ?
राज्यातील महाविकास आघाडीसाठी चिंता वाढवणारी राजकीय बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे चा नारा देत पहिल्या ३० जागांवरील उमेदवार घोषित करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. २६ डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक होणार असून या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या ३० जागांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ची लोकसभा निवडणुक लढलेले आणि सध्या वंचित बहुजन आघाडीत सक्रिय असलेल्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभेच्या ३० जागांवर चर्चा करणार असून त्यावर ठामपणे निर्णय घेतला जाणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्र व्यवहार केला. जाहीर सभेतून एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली परंतु वंचितच्या प्रयत्नांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ‘वंचित’ला आता निर्णायक भूमिका घ्यावी लागत आहे, असंही या नेत्याने सांगितलं आहे.
वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून इंडिया आघाडीचा भाग बनण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु, कॉग्रेसकडून याला प्रतिसाद मिळाला नाही.
वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. मागील २० दिवसांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची ही दुसरी बैठक आहे. मागील बैठक ५ डिसेंबर रोजी मुंबईत झाली होती. यात लोकसभा निवडणुकीची रणनिती आणि रोडमॅप विषयी चर्चा झाली होती.
राज्यभरात वंचित बहुजन आघाडीने सभांचा धडाका लावून निवडणुकीत आघाडी घेतली हे. अकोला, धुळे, सटाणा, मुंबई येथील सभांना लाखोंच्या संख्येने जनतेकडून प्रतिसाद मिळतोय.