राज्य सरकारने पूरग्रस्तांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेला चार दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही चिपळूणकरांच्या खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम आलेली नाही. त्यामुळे चिपळूणकरांमध्ये संतापाची भावना आहे. तर, चिपळूणकरांच्या खात्यात उद्या म्हणजेच मंगळवारी पाच हजार रुपये जमा होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
चिपळूणमधील पूरबाधितांना तातडीची मदत म्हणून 10 हजारापैकी 5 हजार उद्यापासून खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना सरकारकडून हा तात्पुरता दिलासा दिला जात आहे. सरकार लवकरच सर्व आढावा घेऊन पॅकेजची माहिती घेणार आहे, असं देखील सामंत यांनी सांगितलं आहे.
राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका हा चिपळूणला बसला आहे. या महापूरामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. त्यानंतर अनेक राजकिय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. दरम्यान केवळ दौरे करू नका भरघोस मदत करा अशी भावना पूरबाधितांनी केली होती.
सरकारकडून तातडीच्या मदतीची मागणी होत असतांना सरकारकडून पंचनामे पुर्ण झाल्यानंतर संपुर्ण नुकसानीचा आढावा घेऊन पॅकेज जाहीर केलं जाईल असं सांगण्यात आलं होत. दरम्यान आता तातडीच्या मदत म्हणून 10 हजारापैकी 5 हजार रूपये पूरग्रस्तांच्या थेट खात्यात जमा होणार आहे.