Russia Ukraine War : चक्क तालिबानने केले शांततेचे आवाहन
अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तपात घडवणाऱ्या तालिबानने चक्क रशिया आणि युक्रेनला शांततेचे आवाहन केले आहे. त्याबाबत त्यांचे पत्र व्हायरल होत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. त्यातच रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरे ताब्यात घेतले आहेत. तर या युध्दात दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर अमेरीकेने लष्कर मागे घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये नागरीकांवर गोळ्यांचा वर्षाव करणाऱ्या तालिबानने रशिया आणि युक्रेनला शांततेचे आवाहन केले आहे.
तालिबानने रशिया आणि युक्रेन वादाच्या पार्श्वभुमीवर प्रसिध्दीपत्रक शेअर करत रशिया आणि युक्रेनने शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. तर या प्रसिध्दीपत्रकात तालिबानने म्हटले आहे की, इस्लामिक साम्राज्य अफगाणिस्तान हे रशिया आणि युक्रेन युध्दावर बारीक लक्ष ठेऊन आहे. तसेच नागरी वस्तीत निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चिंता वाटत असल्याचे तालिबानने म्हटले आहे.
तालिबानने केलल्या आवाहनात पुढे असे म्हटले आहे की, दोन्ही देशांनी हिंसाचार तीव्र होण्याची भुमिका घेण्यास टाळावे व संयम बाळगावा. तसेच तालिबानच्या तटस्थ धोरणानुसार दोन्ही बाजूंनी हा संघर्ष संवाद आणि समोपचाराने सोडवावा, असे आवाहन तालिबानने केले आहे.
याबरोबरच रशिया आणि युक्रेनमध्ये असलेल्या अफगाणी विद्यार्थी आणि नागरीकांच्या जीविताचे संरक्षण करण्याबाबत लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र क्रुरकर्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालिबानचे हे प्रसिध्दीपत्रक मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
अमेरीकेने अफगाणीस्तानमधील सैन्य माघारी घेतल्यानंतर अनेक दिवस तालिबानने अंदाधुंद गोळीबार करत नागरीकांवर दहशत बसवली होती. मात्र त्याच क्रुरकर्मा तालिबानने शांततेचे आवाहन केल्याने सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर अफगाणिस्तानचे प्रसिध्दीपत्रक मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे.