पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या, वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची पलटी

Update: 2023-09-25 08:54 GMT

गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून मीडिया मॅनेज केल्याची टीका सातत्याने होत आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना धाब्यावर नेण्याचा मोलाचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिलाय. त्यामुळे बावनकुळे वादात सापडले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये भाजपविरोधात थेट भूमिका घेण्याचं देशातील अनेक माध्यमांकडून टाळलं जातं. त्यामुळे या पत्रकारांना पाकिट पत्रकार, विकाऊ पत्रकार किंवा गोदी मीडिया असं विरोधकांकडून म्हटलं जातं. आतापर्यंत हे सगळं बंद दाराआड सुरू होतं. मात्र आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनीच पदाधिकाऱ्यांना पत्रकारांना चहा पाजण्याचा सल्ला दिलाय. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर विरोधी पक्षांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुप्रीया सुळे यांनी जोरदार टीका करत बेजबाबदार विधान केल्याबद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे. यावेळी केलेल्या ट्वीटमध्ये सुप्रीया सुळे यांनी म्हटले आहे की, विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात, हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही, हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही, हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, असं सुप्रीया सुळे यांनी म्हटलंय.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही टोला लगावला आहे. देशातील 12 पत्रकार विकले गेलेले आहेत. याचा अर्थ इतरही विकले जातील असं नाही, असं म्हटलंय.

विरोधी पक्षांच्या टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार चांगले काम करतात. त्यामुळे लोकभावना समजून घेण्यासाठी आणि प्रश्न समजून घेण्यासाठी मी पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा पाजा, त्यांना धाब्यावर नेत जा पण आपल्या बुथविरोधात बातमी येऊ देऊ नका, असा सल्ला दिल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

Tags:    

Similar News