सांगलीतील डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींची आत्महत्या

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याची चर्चा परिसरात आहे;

Update: 2021-12-24 02:05 GMT

सांगली// तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याची चर्चा परिसरात आहे. आत्महत्येचं नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही.

हरिष हणमंत जमदाडे (वय 21), प्रणाली उध्दव पाटील आणि शिवाणी चंद्रकांत घाडगे अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान एक तरुण आणि दोन तरुणी यांनी आत्महत्या केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मणेराजुरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेकोबा डोंगरावर गुरुवारी सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिक जात असतानाच त्यांना तिण मृतदेह आढळून आले. याची माहिती पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी तिथे विषारी औषधाची बाटली, तीन ग्लास, लग्नात वापरण्यात येणारे हार, तुरे, चॉकलेट असे साहित्य आढळून आले. आत्महत्येमागे प्रेमसंबंधांचे कारण असावे, अशी चर्चा आहे. एकाच वेळी तिघांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळावर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. तासगाव पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नात्यातील असणार्‍या प्रणाली या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरू होती. या तरुणीने साडी परिधान केली होती. घटनास्थळावर हार - तुरे असल्याने ते लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र , डोंगरावर येतानाच विषारी औषधाची बाटली घेवून आल्याने नियोजन करूनच आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. मात्र ही आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली की आणखी काही कारणाने याचा नेमका उलगडा अद्याप झालेला नाही.

आत्महत्या केलेला हरीष जमदाडे याचा गेल्या काही महिन्यांपासून पोलीस शोध घेत होते. तो चोरीच्या प्रकरणांतील संशयित आरोपी असून पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तत्पुर्वीच हरीषच्या आत्महत्येची घटना घडली.

Tags:    

Similar News