देशाच्या राजकारणात सध्या झारखंड राज्य मुख्यमंत्री सोरेन यांच्यावरील कारवाईमुळे गाजते आहे. त्यात सरकारला धोका असल्याने आमदारांना लपवण्याची वेळ आली आहे. एकीकडे हा राजकीय तणाव निर्माण झालेला असताना आता झारखंडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील डुमका जिल्ह्यामधील एका खेड्यात काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शाळेतील प्रॅक्टिकलच्या परीक्षेत शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना कमी मार्क दिले, त्यामुळे हे विद्यार्थी संतापले होते. त्यांनी यासंदर्भात शिक्षकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षकांनी आमचे काहीच ऐकून घेतले नाही, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे असल्याची माहिती या भागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांशी संवाद साधला. तसेच घटनास्थळी गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली बाजू या अधिकाऱ्यांकडे मांडली. प्रॅक्टिकल्समध्ये कमी गुण दिले गेले आणि शिक्षकांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद दिला नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांनी चर्चा करण्याच्या बहाण्याने बोलावून आम्हाला मारहाण केली असा आरोप पीडित शिक्षक कुमार सुमन यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांचा खराब निकाल लागण्यास आम्ही जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे. पण प्रॅक्टिकलचे मार्कच त्यांच्या निकालात समाविष्ट कऱण्यात आले नव्हते, अशी माहिती या पीडित शिक्षकांनी दिली. तसेच हे काम मुख्याध्यापकांचे असल्याने आमचा त्यात दोष नाही, असेही या शिक्षकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या घडलेल्या घटनेबाबत पोलीस तक्रार अद्याप तरी करण्यात आलेली नाही.