शाळा सुरू करायच्या की नाही? शिक्षण विभागातर्फे पालकांसाठी सर्वेक्षण

Update: 2021-07-11 02:07 GMT

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. पण आता सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. पण अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे सरकारने आता शाळा सुरू करायच्या की नाही यासाठी थेट पालकांची मते विचारात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. ही प्रश्नावली पालकांनी 12 जुलैच्या आत भरुन पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व पालक व शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. सोमवार दि. १२ जुलैपर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहील. या सर्वेक्षणात मत नोंदविण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आवाहन केले आहे.

सर्वेक्षण लिंक : http://www.maa.ac.in/survey

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ.८ वी ते १२ वी चे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्याचसोबतक अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. हे सर्वेक्षण सोमवार दि.१२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत सुरु राहील. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यातच राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. "राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे.ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करीत आहोत." अशी घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली होती.

Tags:    

Similar News