बीड: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत शनिवारी शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. पण यावेळी झालेल्या गोंधळामुळे धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला सिनेअभिनेता गोविंदा हे सपत्नीक आलो होते. वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर , केक घेण्यासाठी कार्यक्रमाला आलेल्या मुलांनी गर्दी केल्याने झुंबड उडाली होती. तर हा केक घेताना अनेकजण स्टेजवरून खाली देखील पडले.
यावेळी मोठ्या प्रमाणात केक फेकाफेकी करत खुर्च्या देखील अस्ताव्यस्त फेकण्यात आल्या. दरम्यान या मुलांना आटोक्यात आणण्यासाठी केक ऐवजी पोलिसांच्या लाठीचा प्रसाद देखील खावा लागला. पण यामुळे बालहक्कांच्या मुद्यावर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांना सांगितले आहे की, " एक बाल हक्क कार्यकर्ता म्हणून मी सांगू शकतो की बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्याच्या कलम 75अन्वये आयोजक आणि संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करायला हवा. बाल हक्क आयोगाची भूमिका पण हीच असायला हवी.
आयोगाचा कार्यकाळ संपून 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. या काळात अनेक मुलांच्या अत्याचाराच्या घटना घडत आहे हे सत्य आहे यात घटनेत गुन्हा नोंदविणे शक्य आहे"