राज्य सरकारचा अल्टीमेटम ST कर्मचाऱ्यांनी फेटाळला, संपावर ठाम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टीमेटम कर्मचाऱ्यांनी फेटाळत संपावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.;
गेल्या चार महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा एसटीच्या विलिनीरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. तर या संपात 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. मात्र या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यातच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिला आहे. मात्र सरकारने दिलेल्या अल्टीमेटमनंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.
चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यातच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत सेवेत दाखल होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतरही बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटीचे विलिनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपावर निवेदन करताना कर्मचारी सेवेत रूजू झाल्यास त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाया मागे घेऊ, अशी भूमिका घेतली. तर त्यापाठोपाठ पुणे येथे बोलताना अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत म्हटले की, 31 मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी सेवेत दाखल व्हावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान बीड आगारात राज्य सरकारने केलेल्या आवाहनानंतर निषेध करण्यात आला आहे. तर एसटी संपाला बीड जिल्ह्यात 143 दिवस पुर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. राज्य सरकारने केलेली पगारवाढ ही दिशाभूल करणारी असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर सरकारने कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देण्यापेक्षा त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात विचार करावा, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. सध्यातरी एसटी कर्मचारी 31 तारखेपर्यंत कामावर रुजू होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीड मधील एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.
त्यामुळे राज्य सरकारच्या अल्टीमेटमनंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्यामुळे आता येणाऱ्या काळात एसटी कर्मचारी विरूध्द राज्य सरकार संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.