10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? गेल्या 1 वर्षात परीक्षा तंत्र का विकसीत झालं नाही?

गेल्या 1 वर्षापासून कोरोनाचं संकट देशावर आलेलं असताना देशाचं शिक्षण विभाग परीक्षा कशा घ्यायच्या याचं तंत्र विकसीत का करू शकला नाही ? 10 वी आणि 12 वीच्या मुलांच्या शिक्षणाचं पुढील भवितव्य काय? काय आहे मुलांच्या मनातील प्रश्न, देशाचं भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरचं काय? शिक्षण पद्धतीच्या बदलामुळे विद्यार्थी वर्ग डिप्रेशन कडे जातोय का ? यावर प्रियंका आव्हाड यांचा स्पेशल रिपोर्ट नक्की वाचा;

Update: 2021-04-28 09:56 GMT

९ मार्चला महाराष्ट्रासाठी कोरोना १ वर्षाचा झाला. या एका वर्षात कोरोनाशी दोन हात कसे करायचे? याचं ज्ञान अद्यापर्यंत आपल्याला आलं आहे का? किंवा ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे का? सध्याची आजुबाजूची परिस्थिती पाहता त्याचं उत्तर नाही असं येतं. कोरोनामुळं प्रत्येक क्षेत्र ठप्प झालं. एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राला कोरोनाचा फटका बसला नाही. मात्र, आपण या महामारीतून बाहेर पडावं म्हणून काहीच केलं नाही. सगळं काही राम भरोसे सोडून दिलं.

आपलं सरकार आपल्या देशातील लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी एक लस तयार करू शकलं नाही. हा वैज्ञानिकांचा देश आहे का? एवढंच काय देशाचं भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण क्षेत्राकडे देखील सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केलं. परीक्षा कशा घ्याव्यात? सर्व विद्यार्थ्यांना कोरोना काळात कसं शिक्षण द्यावं. त्यासाठी काय तरतूद करावी? याचं साधं तंत्र गेल्या एक वर्षात आपण शोधू शकलो नाहीत का?

सरकारच्या या धोरणामुळं आपल्या देशातील एक पिढी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. ९ वी पास झालेल्या विद्यार्थ्यी शाळेत न जाताच १० वी पास झाले. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असेल. The Free Press Journal च्या २४ नोव्हेंबर २०२० ला प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात ९ वी ते १२ पर्यंतचे शिक्षण घेणारे ५९ लाख २७ हजार ४५६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी नोव्हेंबर मध्ये पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर फक्त ५ टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत हजर होते. त्यामुळं सरकारने शाळेत हजेरी न लावलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्या विशिष्ट वर्गाचं अपेक्षित ज्ञान देताच उत्तीर्ण केलं.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या गोंधळाचं काय? सर्वच वर्गाची हीच परिस्थिती आहे. विशेष बाब म्हणजे ९ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांची, १० वी पास केलेल्या विद्यार्थ्यांची आणि ११ वीतून १२ वीत गेलेल्या विद्यार्थ्यांची देखील हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने जवळ-जवळ १८ लाख विद्यार्थी कोरोनामुळे १० वीत उत्तीर्ण केले आहेत. तर साधारण १६ लाख विद्यार्थी १२ वीच्या परीक्षेची वाट पाहत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. १० वी पास झालेल्या मुलांना ११ वी प्रवेश कोणत्या गुणांच्या आधारे मिळणार? १२ वीच्या विद्यार्थ्याचे पेपर न झाल्याने पुढील प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. त्यातच १२ वी च्या परिक्षेची तयारी करत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळाचं वातावरण आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांचं अजून निरसन झालेलं नाही. एकंदरित परिक्षेसाठी तयार नसलेल्या मुलांना शासनाने कागदोपत्री पास तर केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा या एका वर्षात शिक्षणातून सामाजिक, बौद्धिक, भावनिक, शारीरिक विकास झाला आहे का? कोरोनामुळं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाच्या संकल्पनेलाच खीळ बसली असून हसत खेळत शिक्षणाऐवजी सध्या रडत कढत विद्यार्थ्याचं शिक्षण सुरु आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर Central Board of Secondary Education (CBSE) बोर्डाने १० वीच्या परीक्षा रद्द करत १२ वीच्या परीक्षांची तारीख लवकरचं जाहीर करू. असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केलं. लवकरच बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.

मात्र, ही घोषणा करताना अशा परिस्थिती सरकारने १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होण्यासाठी काय केलं? गेल्या एका वर्षात विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळाचं मळभ दूर करण्यासाठी सरकारने कोण-कोणत्या योजना राबवल्या. कोरोनानंतर आणि कोरोनाच्या काळात मुलांचं शैक्षणिक विकास होण्यासाठी नक्की कोणत्या शैक्षणिक पद्धतींचा, शैक्षणिक साहित्याचा अवलंब करायला हवा. असं केंद्रातल्या अथवा राज्यातल्या एकाही मंत्र्यांने सांगितल्याचं आठवतंय का?

या सर्व प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. गेल्या वर्षभरात सरकारचं शैक्षणिक क्षेत्राकडं अक्षम्य असं दुर्लक्ष झाल्यानं शिक्षणाची एक पिढी बर्बाद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच सरकारच्या या निर्णयांचा विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल? आणि यावर नक्की उपाय काय? या संदर्भात शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांबरोबरच आम्ही विद्यार्थ्यांशी बातचीत केली.

इंदापूर तालुक्यात Daffodil English medium स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या स्नेहल लोकरे सांगते. वर्षभर दहावीचा अभ्यास केला... चांगली टक्केवारी मिळवून चांगल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा होता. परंतु दहावीच्या परिक्षा रद्द केल्याची बातमी पाहिली आणि टेन्शन आलं ते म्हणजे मार्कांचं... गुण कसे देतील? पुढील शिक्षणात काही अडथळा येईल का? असे अनेक प्रश्न पडले. 11 वी चे प्रवेश घेताना संबंधित कॉलेज लेखी स्वरुपात परीक्षा घेऊन प्रवेश देणार असल्याची माहिती सध्या कळतंय. बाकी सगळा गोंधळचं आहे. करोना महामारीमुळे आमच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सरकारकडून आम्हाला योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा असल्याचं स्नेहल सांगते. या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांच्या मानसिकेतवर गंभीर परिणाम झाले आहेत का? सरकार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करतेय की नाही ?

अशीच काहीशी परिस्थिती स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिक्षण घेणारी रंजना धनक यांची देखील आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार 12 वीच्या परिक्षांच्या तारखा सरकार बदलत आहे. परंतू ते विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा यात विचार करत नाही असं मला तरी वाटतं. माझ्या मते जशा दहावीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तशा बारावीच्या करता कामा नये. कारण वर्षभर केलेला अभ्यास वाया जाता कामा नये... माझा पूर्ण अभ्यास झाला असून गुण चांगले मिळवून पुढील शिक्षण चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश व्हावे. अशी इच्छा आहे. बारावीच्या परिक्षा ऑफलाईनपद्धतीने झाल्या पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांना परिक्षेच्या संभ्रमात न ठेवता योग्य तो निर्णय लवकर घ्यावा.

या सर्व गोंधळाचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला? या संदर्भात आम्ही मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी बातचीत केली असता ते सांगतात, करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. ऑनलाईन शाळांमुळे अधिक वेळ मुलं तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे सतत फोन हातात असणं हे देखील मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करणारे आहे. शिक्षणाच्या बदलत्या पद्धतीमुळे पालकांचा आपल्या पाल्यांशी संवाद कमी झाला आहे.

शिक्षणात अनिश्चितता आल्यामुळे मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला जरी असला तरी सरकारने संवादात्मक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. देशाचे भविष्य घडवणाऱ्या पिढीसाठी सरकारने योग्य व्यवस्था करणं गरजेचं आहे. गेल्या वर्षाभरापासून शिक्षण कसे घ्यावे ? या प्रश्नामुळे मुलांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधला पाहिजे. संवाद आणि योग्य मार्गदर्शन हा एकमेव मार्ग या परिस्थितीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी असल्याचं मला वाटतेय. शिक्षणाचा गोंधळ उडाला असताना यात मुलींच्या शिक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑनलाईन शाळा, लॉकडाऊन लागल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागले आहे. दुर्देवाने मुलींची मानसिकता काय असते? याकडे फार लक्ष दिलं जात नाही. मुली घरी बसल्या की त्यांची लग्न लावून देण्याचं प्रमाण महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात वाढलेलं आहे.

करोना महामारीच्या लढाईत देशाचे भविष्य घडवणाऱ्या पिढीच्या मानसिक आरोग्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा एक ही उपक्रम शिक्षण विभागाकडून राबविल्याचं माझ्या माहितीत नाही. सगळं काही आलबेल असल्याच वाव सरकार आणतेय. असं मानसोपचार तज्ज्ञ राजेंद्र बर्वे यांनी सांगितलं. लॉकडाऊनचा विद्यार्थ्यांच्या सामाजिक अंगावर काय परिणाम झाला? यावर प्राध्यापक हेरंब कुलकर्णी सांगतात की,

शिक्षणात चार भिंती ची शाळा ही संकल्पना बदलून पर्यायी शिक्षणाच्या रचनाही आता तयार ठेवाव्या लागणार आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा व त्यातून झालेल्या आत्महत्या लक्षात घेता ऑनलाइन हा पर्याय शासनाने न स्वीकारता स्वाध्याय पुस्तिका छापून त्या वितरित करणे, विद्यार्थ्यांना स्वयम् अध्ययनाची सामुग्री देऊन स्वयम् अध्ययनाची मानसिकता तयार करणे असे स्वरूप आता बदलावे लागणार आहे. त्याच बरोबर कोरोना काळात झालेले स्थलांतर वाढलेली गरीबी याचा फटका गरीब कुटुंबातील मुलांना बसणार आहे ती मुले कदाचित काही कुटुंबातून शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बालमजुरी करतील मुलींची जबाबदारी नको म्हणून कोरोनात बालविवाह मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपण बघतोच आहे. तेव्हा वंचित कुटुंबातील वंचित बालकांच्या शिक्षणाचा खूप मोठा फटका बसू शकतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे वस्तीगृह उभारणे व स्थलांतरित कुटुंबातील मुलांचे शिक्षण खंडित होऊ न देणे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

कोविड काळातल्या शिक्षण पद्धतीसंदर्भात नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनचे सहसचिव डॉ. कुशल मारोती मुडे सांगतात की, जागतिक स्तरावर उद्धभवलेल्या कोविड 19 या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 हे संपूर्ण ऑनलाईनच्या माध्यमातून सगळ्या शैक्षणिक मंडळांनी पूर्ण केले. आता परिक्षेचा कालावधी असताना ज्या मंडळांच्या 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा मार्च-एप्रिल महिन्यात होऊ घातल्या होत्या. परंतु करोनाची दुसरी लाट भारतात आल्यामुळे परिक्षा घेणं शक्य नसल्याचं सगळ्या मंडळांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे.

परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय बहुतांश सगळ्याच मंडळांनी घेतला असला तरी बारावीची परिक्षा स्थगित करून पुढे ढकलण्यात आली असं सांगण्यात आलंय. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक भिती अशी निर्माण झाली आहे की, परिक्षा रद्द झाल्यामुळे 11 वी चे प्रवेश कुठल्या आधारावर होतील? किंवा त्यांच्या शैक्षणिक करिअरवर याचा काही परिणाम होणार आहे काय? याबाबत केंद्राच्या शिक्षण मंत्रालयाने एक धोरणात्मक निर्णय घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्याचा समावेश करून mode of evolution बदलणं गरजेचे आहे. असं प्राथमिक दिसून येते.

आपण 2020-21 या शैक्षणिक वर्षाकडे जर बघितले तर बहुतांश मंडळांचे सगळे वर्ग ऑनलाईनच्या मार्गातून झाले आहेत, ही परिस्थिती जरी खरी असली की परिक्षा रद्द झाल्याने mode of evolution बदलेलं गेलेलं आहे. इंटरनल असेसेमेंट किंवा गुगल क्लासरूमच्या माध्यमातून किंवा असाईनमेंटच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मॉनिटेरींग करुन परिक्षा मंडळांनी परिक्षा घेतल्या असल्या तरी अंतिम परिक्षा ही सुद्धा इंटरनल असेसमेंटच्या आधारावर घेण शक्य आहे.

परंतु त्याच्या अनुषंगाने सगळ्या मंडळाने एक निर्णय जाहीर करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे होईल तो निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जर जाहीर केला तर विद्यार्थ्यांच्या मनातली भिती व तणाव दूर होईल. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर त्याचा काही परिणाम होऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक धोरणात्मक निर्णय घेऊन परिपत्रक जारी करणे आवश्यक आहे.

धोरणात्मक निर्णय जाहीर केल्यास कुठल्याही विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पुढील आयुष्याच्याची चिंता वाटणार नाही आणि मनात असलेला तणाव दूर होण्यास मदत होईल. दहावीच्या परिक्षा रद्द झाल्या आहेत असं परिपत्रक केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांच्या समन्वयाने जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना त्याच्या तणावातून मुक्त होण्यास मदत होईल. mode of evaluation बदलेलं आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून असेसमेंट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. या अनुषंगाने केंद्रीय मंत्रालयाची सगळ्या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या समन्वयाने एक निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. असं मुडे यांनी सांगितलं.

एकंदरित वर्ष उलटूनही गेले तरी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे शिक्षण देता आलेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का? विषय समजला आहे का? यासाठी आगामी काळात गांभीर्याने काम करावे लागणार आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करत अभ्यासक्रम तयार करायला हवा. गणित इंग्रजी यासारख्या विषयासाठी कोणत्या शिक्षण पद्धती अधिक सोइस्कर ठरतील. यासाठी शिक्षकांना ऑनलाईन ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. कोरोनानंतर मुलांना पुन्हा एकदा मुख्य शिक्षण प्रक्रियेत आणण्यासाठी प्लान करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना तणावातून, चिंतेतून मोकळा श्वास घेण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी तसेच सरकारने धोरणात्मक निर्णय घेत योग्य मार्गदर्शन आणि सातत्याने संवाद ठेवणं अतिशय गरजेच आहे.

मुलांच्या करिअरचं काय?

10 पास झालेल्या आणि 12 वीचे पेपर देणाऱ्या मुलांच्या करिअरचं काय? त्यांनी पुढील मार्ग कसे निवडावे यासंदर्भात आम्ही करिअर आणि अभ्यासक्रम मार्गदर्शक आशुतोष शिर्के यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले शासनाने दहावीच्या परिक्षासंदर्भात घेतलेला निर्णय हा दिलासापूर्वकच निर्णय आहे. एकूण या निर्णयामुळे ज्या काही अडचणी येणार असल्यातरी हा निर्णय योग्य आहे. कारण या महामारीत अनेक विद्यार्थी त्यांचे कुटुंब करोनाबाधित होत आहे. त्यामुळे त्यांची जी मानसिकता झाली आहे. त्यामध्ये या परिक्षा घेणं अयोग्य ठरलं असतं.

शासनाने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम...

या निर्णयामुळे काही अडचणी या शॉर्टटर्म असतील तर काही लाँग टर्म असतील. सरकारच्या निर्णयानुसार दहावीच्या परिक्षा रद्द केल्यामुळे पुढील प्रवेशप्रक्रियासाठी 10 वीच्या निकालाचे निकष आपण बाद करणार असू तर वेगवेगळ्या शाखेत 11 वी प्रवेशप्रक्रिया कशा होणार...? या गोंधळामुळे शिक्षण पद्धतीसंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांचा सिस्टिमवर चा विश्वास जाणार आहे. शिक्षणातल्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांनी पुढील मार्ग कसे शोधावे... विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वेगळा विचार करण्याची गरज आहे.

वेग-वेगळ्या शाखा, कोर्सेससाठी दहावीची मार्कशीट ही गरजेची असते. त्यामुळे मार्कशीटचं नसल्यामुळे प्रवेशासाठी गोंधळ उडणार आहे कारण कोणत्या निकषाच्या आधारे प्रवेश मिळणार विद्यार्थ्यांनी परिक्षार्थी असू नये... हे अगदी मान्य आणि दहावीच्या परिक्षेला आपल्याकडे अवास्तव असं महत्त्व दिलं आहे. हे मान्य पण तरी सुद्धा दहावीच्या परिक्षेचे महत्त्व जास्त आहे. कारण शालेय शिक्षणाची ही शेवटीची परिक्षा असते आणि महाविद्यालयीन परिक्षा सुरु होणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शाखा निवडायच्या असतात.

करिअर निवडायचे असतात. अभ्यास क्रमाचे मार्ग घ्यायचे असतात. यामध्ये मुलांचा फोकस हा गुणवत्तेवर असल्याची मानसिकता आपल्याला पाहायला मिळते. वर्षभर या गुणवत्तेसाठी ही मुलं अभ्यास करत असतात. मात्र, या अननिश्चितेमुळे त्यांचा आत्मविश्वास, उर्जास्त्रोत, प्रेरणा संपुष्टात येण्याची भिती आहे.

दोन वर्ष हा कालखंड राहणार आहे. नववी-दहावी किंवा दहावी-अकरावी हा शालेय जीवनातला मोठा आणि महत्त्वाचा कालखंड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यी आपला बेस्ट देण्याकरिता भरपूर अभ्यास करत असतात. परंतु एवढा अभ्यास केल्यानंतर कळत की परिक्षाचं होणार नाही. या अनिश्चितमुळे त्यांचा प्रेरणा तर कमी होईलच पण करिअरबद्दल जो विश्वास तयार व्हायला हवा. जो आत्मविश्वास तयार व्हायला हवा. तो कमवण्याचा दुसरा कोणताही मार्ग सध्यातरी आपल्याकडे नाही. आत्मविश्वास पुन्हा आणण्यासाठी शिक्षण विभागाला वेग-वेगळे उपक्रम घ्यावे लागतील.

शाळा सुरु असताना अभ्यासव्यतिरिक्त व्यक्तिमत्वाच्या विकासाला आणि आत्मविश्वासाला चालना देणासाठी कौशल्य, वर्कृत्व स्पर्धा, नाटय, चर्चासत्र असे वेग-वेगळे उपक्रम राबविले जातात. परंतु शाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होणार आहे.

विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळणार नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेने त्यांच्या आत्मविश्वासवाढीला प्रेरणा देणारे काही प्रोजेक्ट त्यांना दिले पाहिजे.

असुरक्षिता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाली असून शिक्षण व्यस्थेवरचा विश्वास कसा आणता येईल याचा विचार करणं गरजेच.

गुण निकष नसतील तर विद्यार्थ्यांनी आता आपली आवड, कलागुण, कौशल्य ओळखून मार्ग निवडली पाहिजे. असं आशुतोष शिर्के सांगतात.

एकंदरीत सर्व तज्ज्ञांशी बातचीत केल्यानंतर काही निष्कर्ष समोर येतात...

कोव्हिड काळ कधी संपेल हे अनिश्चित आहे. त्यामुळं कोव्हिड काळात मुलांच्या शिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रम तयार करणं गरजेचं आहे. कोव्हिड काळानंतर मुलं शाळेत आल्यानंतर मूळ अभ्यासक्रमाला सुरुवात करताना मुलांच्या मानसिकतेचा विचार करून अध्यापन पद्धती आणि अभ्यासक्रमाची निवड करण्याच्या सूचना शिक्षकांना द्याव्यात. ज्या मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचलेलं नाही. त्यांच्यासाठी स्वयं अध्ययन ही प्रक्रिया राबवून त्यांचा किमान अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे.

10 वीच्या परीक्षा झाल्या नसल्यानं त्यांचा 11 वी प्रवेश कोणत्या मुल्यमापन पद्धतीने होणार? हे सरकारने स्पष्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलांच्या मनातील गोंधळ कमी होईल. 12 वीच्या परीक्षा संदर्भात सरकारने धोरण ठरवून कोव्हिड काळात परीक्षा कशा घेता येतील. यांचं नियोजन करणं गरजेचं आहे. यासाठी इतर देशाने नक्की काय मॉडेल तयार केले आहेत. याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे.

ज्या मुलांच्या परीक्षा बाकी आहेत. अशा मुलांचं तात्काळ लसीकरण करणं गरेजचं आहे. शक्य झालं तर त्यांच्या पालकांच्या देखील लसीकरण केल्यास अधिक चांगलं होईल. जी मुलं शालाबाह्य झाली आहेत. त्यांना पुन्हा शाळेत आणणं गरजेचं आहे. असे उपाय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहेत.


Tags:    

Similar News