केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या Smriti Irani यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेत्यांना कोर्टाने धक्का दिला आहे. स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीची बदनामी कऱणारा मजकूर काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर टाकला असा आरोप करत मानहानीचा दावा दाखल कऱण्यात आला होता. या प्रकरणात कोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारत तासाभराच्या आत ते ट्विट्स डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.
गोव्यातील एक रेस्टॉरंट स्मृती इराणी यांच्या मुलीचे आहे आणि तिथे अनधिकृतपणे बार चालवला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. तसेच यासंदर्भात ट्विट देखील केले होते. याच ट्विटसला आक्षेप घेत स्मृती इराणी यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर निर्णय देतांना कोर्टाने काँग्रेसचे जयराम रमेश, पवन खेरा आणि नेटा डिसुझा यांना ते ट्विट डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच कोर्टाने या तिन्ही नेत्यांना १८ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर या नेत्यांनी ट्विट डिलीट केले नाही तर ट्विटरने ते ट्विट्स डिलीट करावे असेही सांगितले आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे, दिल्ली हायकोर्टाने आम्हाला स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. पण कोर्टासमोर यातील सर्व तथ्य मांडणार आहोत, तसेच इराणी यांच्या दाव्यांना आम्ही आव्हान देऊ आणि त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे ठरवू असेही त्यांनी म्हटले आहे.