आमचं चुकलं असेल तर आम्हाला फाशी द्या, जयप्रभा स्टुडिओ वादावर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रतिक्रीया
कोल्हापुरमधील जयप्रभा स्टुडिओचा वाद पेटला, शिवसेनेचे माजी आमदार म्हणाले आम्ही चुकलो असेल तर आम्हाला फाशी द्या.
कोल्हापुर शहरातील प्रसिध्द स्टुडिओ असलेल्या जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणी केली जात आहे. मात्र या स्टुडिओची खरेदी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलासह काही बड्या व्यापाऱ्यांनी केली असल्याचे समोर आले आहे. त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. त्यावर आमचं चुकलं असेल तर आम्हाला फाशी द्या, अशी प्रतिक्रीया आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापुर शहरातील जयप्रभा या प्रसिध्द स्टुडिओमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मारक उभे करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेनेच्या माजी आमदारांच्या पुत्रासह काही व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचे समोर आल्याने कोल्हापुरकर आक्रमक झाले आहेत. तर स्टुडिओची खरेदी करणाऱ्या रौनक शहा गुंदेशा आणि पोपट शहा गुंदेशा यांच्या कार्यालयावर शाई फेकून त्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रीया देतांना शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, या व्यवहाराबाबत मला माहिती नाही. मात्र या व्यवहारात बेकायदेशीर काय आहे? तसेच यात बेकायदेशीर काही असेल आणि आमचं चुकलं असेल तर आम्हाला फाशी द्या.
कोल्हापुर येथील जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापुरकर आक्रमक झाले आहेत. तर हा स्टुडिओ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानावर शाईफेक करण्यात आली. तसेच जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने उपोषण करण्यात आले. तर कोल्हापुर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापुरचे वैभव जतन करण्याची मागणी केली.
राजेश क्षीरसागर म्हणाले की, व्यवहारात काही बेकायदेशीर झाले असेल तर त्याला जबाबदार मी असेल. याबरोबरच माझ्या मुलाने काही बेकायदेशीर प्रकार केला असेल तर मी आणि माझा मुलगा राजकीय संन्यास घेईल. तसेच एखादी खाजगी जागा खरेदी करण्याचा भारतीय राज्यघटनेने अधिकार दिला आहे. मात्र जनतेचा भावनांचा आदर करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मत राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी क्षीरसागर म्हणाले की, मी स्वाभिमानी आहे. माझी मुलं स्वाभिमानी आहेत. त्यामुळे मी किंवा माझी मुलं चुकले तर मी माफी मागायला तयार आहे. तसेच यात बेकायदेशीर व्यवहार झाला असेल तर आम्हाला फाशी द्या, असे मत राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. तर स्टुडिओचे कोणतेही अस्तित्व मिटवले जाणार नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.