शिवसेना महाराष्ट्राबाहेरील पहिल्या लोकसभा विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपला धक्का
एकीकडे नांदेडमधील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेसने पिछाडीवर टाकलेले असताना आता भाजपला लोकसभा पोटनिवडणुकीतही धक्का बसण्याची शक्यता आहे. दादरा-नगर हवेली इथल्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी आता विजयी आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे. कलाबेन यांच्या रुपाने शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेर लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय ठरणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करत महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला मोठा विजय, आता दादरा-नगर हवेली मार्गे दिल्लीचे ध्येय आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राबाहेर झालेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे मानले जाते आहे. कलाबेन डेलकर यांच्याविरुद्ध भाजपचे महेश गावित रिंगणात आहेत. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती.
First step outside Maharashtra, giant leap towards Delhi via Dadra Nagar Haveli ! #ChaloDelhi pic.twitter.com/8sbqBgSbna
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 2, 2021
कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर हे खासदार होते, पण त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपच्या काही नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर कलाबेन डेलकर यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. २०१९च्या निवडणुकीत मोहन डेलकर यांनी भाजपच्या तत्कालीन खासदाराचा पराभव केला होता. ते अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. भाजपने या निवडणुकीत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उतरवले होते. तर शिवसेनेत्रफे आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचार केला होता.