कुठं घोटाळा, कुठं गुटखा किंग तर कुठं तस्करीचा मास्टरमाइंड;उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत चाललं काय?
राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष असून, खुद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. मात्र असे असतांना गेल्या काही दिवसात अनेक अवैध धंद्यात आणि कारवाईत शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची नावे समोर येत असल्याने शिवसेनेत चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना राजकीय वरदहस्ताने सुरू असलेल्या गुटखा माफियांच्या विरोधात बीड पोलिसांनी कडक पावले उचलत केलेल्या कारवाईत बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात बायोडिझेल अवैधरित्या विक्रीचे मास्टरमाइंड म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख आणि केडगावमधील हॉटेल व्यावसायिक दिलीप सातपुते या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
तर औरंगाबादमध्ये गाजत असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यात शिवसेना नेत्यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि दुसरीकडे गुन्हेगारी कारवाईत शिवसेना नेत्यांचे नाव समोर येणे गंभीर आहे. जर सत्ताधारी पक्षातील नेतेच अवैध धंद्यात उतरले असतील पोलिसांवर सुद्धा कारवाई करतांना राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दखल घेऊन पक्षाला शिस्तीचे डोस देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.